पूर नुकसानीच्या पाहणीसाठी जिल्ह्यात संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम पथक दाखल

कोल्हापूर: जिल्ह्यात महापुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम पथक जिल्ह्यात आज दाखल झाले. पुनर्प्राप्ती सल्लागार डॉ. कृष्ण वत्स यांच्या नेतृत्वाखाली गृहनिर्माण तज्ज्ञ पी.के.दास, उप जीविका तज्ज्ञ हेमंत वाळवेकर आणि अविनाश कुमार यांचा या पथकात समावेश आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयातील राजर्षी शाहू सभागृहात या पथकासमवेत आज बैठक झाली. जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता राजेंद्र संकपाळ, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानदेव वाकुरे, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे आदी यावेळी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. देसाई यांनी यावेळी संगणकीय सादरीकरण करुन सविस्तर माहिती दिली. 30 जुलै ते 10 ऑगस्ट या 10 दिवसाच्या कालावधीत सर्वाधिक पाऊस जिल्ह्यामध्ये झाला. मुक्त पाणलोट क्षेत्रामधूनही पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात होता. या 10 दिवसांमध्ये सरासरी 90.54 मि.मी. इतका पाऊस झाला. जिल्ह्यातील 345 गावे या महापुरात बाधित झाली. यामध्ये 9542 पूर्णत: घरांचे तर 31492, अंशत: घरांचे नुकसान झाले आहे. 4221 गोठ्यांचे नुकसान झाले आहे. पूरामुळे 78102 हेक्टर पिकांचे, तसेच 337 हेक्टर जमिनीचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यात एकूण 282 रस्त्यांचे नुकसान झाले आहे.

कृष्णा, भीमा स्थिरीकरण प्रकल्पाच्या माध्यमातून पुराचे जादा वाहून जाणारे 115 टी.एम.सी. पाणी दुष्काळग्रस्त तालुक्यांना पोहचविण्याचे नियोजित आहे. भविष्यामध्ये असा महापूर आल्यास त्यासाठी उपाय योजना म्हणून रस्त्यांची उंची वाढविणे, आवश्यक त्याठिकाणी उड्डाण पूल बांधणे, आवश्यक त्या ठिकाणी पुलांची निर्मिती करणे, महावितरणचे उप केंद्र उंच ठिकाणावर बसविणे, विजेच्या खांबांची उंची वाढविणे असे नियोजित आहे.

या सादरीकरणानंतर समितीच्या सदस्यांनी उपाय योजनांबाबत चर्चा केली. या समितीने आज काही भागांतील नुकसानीची पाहणी केली असून, उद्या काही पुरग्रस्तभागांना भेट देणार आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here