वेलिंग्टन – न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियादरम्यान पाच टी-20 सामन्यांच्या मालिकेतील अखेरच्या सामन्यात न्यूझीलंडने ऑस्ट्रेलियाचा 7 गडी राखून पराभव केला. या विजयासह न्यूझीलंडने मालिका 3-2 ने जिंकली. न्यूझीलंडने ऑस्ट्रेलियाविरुद्ध प्रथमच टी-20 मालिका जिंकली आहे.
प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने निर्धारित 20 षटकांत 8 बाद 142 धावा केल्या. हे आव्हान न्यूझीलंडने 15.3 षटकांत तीन गडी गमावून सहजरित्या पार केले. न्यूझीलंडच्या विजयाचा नायक सलामीवीर मार्टिन गप्टिल ठरला. त्याने 46 चेंडूत 71 धावांची आक्रमक खेळी केली. यासह त्याने भारताचा सलामीवीर रोहित शर्माला मागे टाकत टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा फटकावणाऱ्या खेळाडूंच्या यादीत दुसरे स्थान पटकावले आहे.
आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत रोहित शर्माला मागे टाकून मार्टिन गप्टिल आता दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. गप्टिलने दोन शतके आणि 17 अर्धशतकांच्या मदतीने 99 सामन्यांत 2839 धावा केल्या आहेत.
रोहित शर्माने 108 आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यांत चार शतके आणि 21 अर्धशतकांसह 2774 धावा केल्या आहेत. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली 85 सामन्यांत 2928 धावा बनवून अव्वलस्थानी कायम आहे. गप्टिलने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या मालिकेत दोन अर्धशतकांच्या मदतीने 218 धावा
ठोकल्या आहेत.