अबुधाबी – आयसीसी टी-20 विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेतील पहिला उपांत्य सामना इंग्लंड व न्यूझीलंड यांच्यात होत आहे. या सामन्यातील विजयाद्वारे अंतिम फेरी गाठण्यासाठी दोन्ही संघ प्रयत्नशील आहेत. मात्र, इंग्लंड संघाला खेळाडूंच्या दुखापतीने ग्रासले असून सामन्यापूर्वी त्यांचे प्रमुख खेळाडू फिट ठरणार का हा प्रश्न आहे. दुसरीकडे अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यातील अव्वल खेळामुळे न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन भरात आल्याने त्यांना दिलासा मिळाला आहे.
इंग्लंडचा सलामीवीर फलंदाज जेसन रॉय याला दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर जावे लागले आहे. सुपर 12 फेरीतील दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात रॉयला दुखापत झाली होती. या स्पर्धेत इंग्लंड संघाने यशस्वी वाटचाल करत उपांत्य फेरी गाठली असली तरीही त्यांना पहिल्या सामन्यापासूनच खेळाडूंच्या दुखापतीने त्रस्त केले होते. त्यांचा डावखुरा वेगवान गोलंदाज टायमल मिल्सही दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडला होता. उपांत्य लढतीसाठी रॉयच्या जागी जेम्स विन्सचा संघात समावेश करण्यात आला आहे.
इंग्लंड आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांनी आतापर्यंत या स्पर्धेत सुपर 12 फेरीतील 5 सामन्यांपैकी 4 सामने जिंकले आहेत. या लढतीत इंग्लंडची फलंदाजी जास्त भक्कम मानली जात असली तरीही न्यूझीलंडचे टीम साउदी, ट्रेंट बोल्ट, इश सोधी व मिचेल सॅंटनर या गोलंदाजांनीही प्रतिस्पर्धी संघांवर सातत्याने वर्चस्व राखले आहे. त्यामुळे इंग्लंडच्या मधल्या फळीला जबाबदारीने खेळ करावा लागणार आहे.
2019 सालचा एकदिवसीय सामन्यांचा विश्वकरंडक इंग्लंडनेच जिंकला होता. त्या सामन्यात पंचांच्या चुकीच्या निर्णयाचा फटका न्यूझीलंडला बसला होता. आता टी-20 विश्वकरंडकात पुन्हा एकदा हे दोन संघ आमनेसामने येत आहेत.
इंग्लंडचे जोस बटलर, मोईन अली, लियाम लिव्हिंगस्टोन, कर्णधार इयान मॉर्गन, डेव्हीड मलान व ख्रिस वोक्स भरात असून त्यांना रोखण्याचे आव्हान साउदी, बोल्ट आणि कंपनीवर राहणार आहे. इंग्लंडची गोलंदाजी वोक्स, आदील रशीद, मोईन अली व ख्रिस जॉर्डन यांच्यावरच अवलंबून आहे. दुसरीकडे न्यूझीलंडच्या संघालाही जबाबदारीने खेळ करावा लागणार आहे. त्यांचा सलामीवीर मार्टीन गुप्टील सध्या प्रचंड भरात असून त्यांचा कर्णधार विल्यमसनलाही सुर गवसल्याने इंग्लंडच्या चिंतेत भर पडली आहे.
या स्पर्धेत न्यूझीलंडची वाटचालही स्वप्नवत ठरली आहे. पाकिस्तानविरुद्धचा सामना वगळता त्यांनीही सलग चार सामने जिंकले असल्याने त्यांचाही आत्मविश्वास उंचावला आहे. डॅरेल मिशेल, ग्लेन फिलिप्स व डेव्हन कॉनवे हे इंग्लंडच्या गोलंदाजांसाठी डोकेदुखी ठरू शकतात.
न्यूझीलंडची गोलंदाजी कागदावर तरी इंग्लंडपेक्षा सरस वाटत असली तरीही प्रत्यक्ष सामन्यात ते कशी कामगिरी करतात यावर त्यांचे यश अवलंबून आहे. न्यूझीलंड संघाला अद्याप टी-20 विश्वकरंडक स्पर्धेचे विजेतेपद मिळवता आलेले नाही. त्यामुळे हा सामना जिंकत अंतिम फेरी गाठून विश्वकरंडक विजयाचे न्यूझीलंडचे स्वप्न यंदा तरी पूर्ण होणार का हे पाहणे रंजक ठरणार आहे.
गुप्टील ट्रम्पकार्ड ठरेल
यंदाच्या स्पर्धेत नेत्रदीपक खेळी करत न्यूझीलंडच्या मार्टीन गुप्टीलने सर्व संघांच्या गोलंदाजांवर वर्चस्व राखले आहे. सलामीला फलंदाजीला येत समोरच्या गोलंदाजीची वाताहत करत संघाला धडाक्यात सुरुवात करून देण्यात तो सातत्याने यशस्वी ठरला आहे. त्याच्या आक्रमकतेवर अंकुश राखण्यात इंग्लंडच्या गोलंदाजांना यश आले तर त्यांना हा सामना जिंकण्याची संधी मिळेल. मात्र, दोन्ही संघांचे बलाबल पाहता गुप्टील ट्रम्पकार्ड ठरेल.