#CWC19 : श्‍वास रोखणारे ब्रेथवेटचे शतक; न्यूझीलंडचा 5 धावांनी विजय

मॅंचेस्टर – वेस्ट इंडिजच्या कार्लोस ब्रेथवेट याने तडाखेबाज शतक ठोकत न्यूझीलंडच्या खेळाडूंबरोबरच प्रेक्षकांचा श्‍वासही 49 व्या षटकापर्यंत रोखून ठेवला, परंतु जेम्स नीशाम याच्या चेंडूवर तो बाद झाला आणि त्याच्या संघास 5 धावांनी पराभव पत्करावा लागला. या पराभवामुळे विडींजच्या उपांत्य फेरीत स्थान मिळविण्याच्या आशाही संपुष्टात आल्या. न्यूझीलंडने उपांत्य फेरीच्या दिशेने वाटचाल केली आहे.

कर्णधार केन विल्यमसन याने कारकीर्दितील सर्वोत्तम 148 धावांची खेळी केली. त्यामुळेच न्यूझीलंडला विडींजपुढे 292 धावांचे लक्ष्य ठेवता आले. रॉस टेलर याने दमदार 69 धावा करीत त्याला चांगली साथ दिली. ख्रिस गेल याने झंझावती 87 धावा करूनही विडींजची 7 बाद 164 अशी स्थिती झाली होती. त्यवेळी त्यांना 200 धावांपलीकडे जाता येणार नाही असे वाटले होते. तथापि ब्रेथवेट याने कमालीची जिद्द दाखवित मैदान दणाणून सोडले. त्याच्या या खेळामुळे न्यूझीलंडच्या तोंडचे पाणी पळाले होते. न्यूझीलंडच्या नीशाम याने त्याची शानदार खेळी संपविली व संघाची विजयश्री खेचून आणली.

विडींजने शाय होप व निकोलस पूरन यांच्या विकेट्‌स झटपट गमाविल्या. गेल व शिमोरन हेटमेयर यांनी आक्रमक खेळ करीत संघाचा डाव सावरला. गेल याने 8 चौकार व 6 षटकारांसह 87 धावा केल्या. हेटमेयर याने 8 चौकार व एक षटकारासह 54 धावा केल्या. त्यांनी 122 धावांची भागीदारी केली. त्यावेळी त्यांचा विजयाचा पाया रचला गेला असेच वाटले होते. तथापि ही जोडी फुटल्यावर त्यांचा डाव गडगडला. त्यांची ही घसरगुंडी ब्रेथवेट याने रोखली. त्याने न्यूझीलंडच्या सर्वच गोलंदाजांना फोडून काढले. 48 व्या षटकात त्याने तीन षटकार व एक चौकार मारले. त्यामुळे शेवट्‌च्या दोन षटकात विडींजला 12 धावांची गरज होती. नंतरच्या षटकात त्याने दोन धावा करीत शतक साजरे केले. मात्र याच षटकात उंच फटका मारण्याच्या प्रयत्नात त्याने ट्रेंट बोल्ड याच्याकडे झेल दिला.

संस्मरणीय खेळी – ब्रेथवेट 

हा सामना आम्ही गमावला असला तरी या सामन्यातील माझे शतक मला नेहमीच स्मरणात राहील. एवढे शतक माझ्याकडून होईल अशी मी कधी अपेक्षाच केली नव्हती. शेवटच्या फळीत मला माझ्या सहकाऱ्यांनी उत्तम सहकार्य दिले. त्यामुळेच मला या शतकाचा अनुभव घेता आला. मात्र आम्ही जिंकलो असतो तर हे शतक अधिक मौल्यवान ठरले असते. या शतकामुळे फलंदाज म्हणूनही आपल्याकडे क्षमता आहे हा आत्मविश्‍वास मला मिळाला आहे असे ब्रेथवेट याने सांगितले.

संक्षिप्त धावफलक –

न्यूझीलंड 50 षटकात 8 बाद 291 (केन विल्यमसन 148, रॉस टेलर 69, जेम्स नीशाम 28, शेल्ड्रॉन कॉट्रेल 4-56, कार्लोस ब्रेथवेट 2-58)

वेस्ट इंडीज 49 षटकात सर्वबाद 286 (ख्रिस गेल 87, शिमोरन हेटमेयर 54, कार्लोस ब्रेथवेट 101, ट्रेंट बोल्ट 4-30, लॉकी फर्ग्युसन 3-59)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)