#NZvIND : अखेरच्या सामन्यात भारताचा पराभव; न्यूझीलंडचा 2-1 ने मालिका विजय

हॅमिल्टन- अखेरच्या आणि निर्णायक टी-20 क्रिकेट सामन्यात भारतीय संघाचा न्यूझीलंडकडून पराभव झाला आहे. न्यूझीलंडने भारताचा 4 धावांनी पराभव करत विजय संपादित केला. या विजयासह न्यूझीलंडने तीन सामन्यांची टी20 क्रिकेट मालिका 2-1 ने आपल्या नावे केली आहे. त्यामुळे भारतीय संघाचे न्यूझीलंडच्या धर्तीवर पहिली टी-20 मालिका विजय मिळविण्याचे स्वप्न अपूर राहिले आहे.

आजच्या सामन्यात फलंदाजीत 40 चेंडूत 72 धावा करणारा न्यूझीलंडचा फलंदाज काॅलिन मुनरो हा सामनावीर ठरला. तर टीम सीफर्ट याने मालिकावीराचा किताब पटकाविला.

विजयासाठी 213 धावांचा पाठलाग करताना भारतीय संघ 20 षटकांत 6 बाद 208 धावसंख्येपर्यतच मजल मारू शकला. भारतीय संघाचे सलामीवीर शिखर धवन पुन्हा एकदा अपयशी ठरला, तो 5 धावांवर तंबूत परतला. त्यानंतर रोहित शर्माने 32 चेंडूत 38 आणि विजय शंकरने 28 चेंडूत 43 धावा करत भारताच्या विजयाच्या आशा पल्लवित केल्या होत्या.

ऋषभ पंत 28, हार्दिक पांड्या 21 आणि एम.एस.धोनीला 2 धावांवर बाद करत न्यूझीलंडने सामन्यावर पकड मिळविली. त्यांनतर दिनेश कार्तिकने 16 चेंडूत नाबाद 33 आणि क्रुणाल पांड्याने 13 चेंडूत नाबाद 26 धावा केल्या, मात्र दोघेही भारतीय संघास विजय मिळवून देण्यास अपयशी ठरले. न्यूझीलंडकडून मिचेल सैंटनरने आणि डेरिल मिशेलने प्रत्येकी 2 विकेटस घेतल्या. तर स्काॅट कुग्गेलिजन आणि ब्लेयर टिकनरने प्रत्येकी 1 विकेटस घेतली.

दरम्यान, हॅमिल्टन येथील सेड्डोन पार्क मैदानावर भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडच्या संघाने 20 षटकांत 4 बाद 212 धावा केल्या होत्या. न्यूझीलंडच्या संघाने आक्रमक सुरूवात केली.

न्यूझीलंडच्या सलामीवीरांनी पहिल्या विकेटसाठी 46 चेंडूत 80 धावा जोडल्या. सलामीवीर टिम सीफर्टने 25 चेंडूत 43 धावा केल्या तर काॅलिन मुनरोने 40 चेंडूत 72 धावा केल्या. केन विलियमसनने 27(21), काॅलिन डी ग्रैंडहोमने 30(16) धावा केल्या. तर डेरिल मिशलने नाबाद 19 आणि राॅस टेलरने नाबाद 7 धावा केल्या. भारतीय गोलंदाजीत कुलदीप यादवने 4 षटकांत 26 धावा देत सर्वाधिक 2 विकेट घेतल्या. तर भुवनेश्वर कुमार आणि खलील अहमदने प्रत्येकी एक विकेट घेतली.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)