kutimb

न्यूझीलंड 20 सदस्यीय संघासह भारत दौऱ्यावर

टी-20 विश्‍वचषक स्पर्धेबाबत प्रशिक्षक गॅरी स्टेड यांची माहिती

वेलिंग्टन – यंदाची टी-20 विश्‍वचषक स्पर्धा ऑक्‍टोबर-नोव्हेंबरमध्ये भारतात पार पडणार आहे. या स्पर्धेवर करोनाचे सावट असल्याने आतापासूनच खबरदारी घेण्यात येत आहे. या पार्श्‍वभूमीवर न्यूझीलंडचे मुख्य प्रशिक्षक गॅरी स्टेड यांनी महत्त्वपूर्ण विधान केले आहे. या स्पर्धेसाठी न्यूझीलंड 20 सदस्यीय संघासह भारत दौऱ्यावर जाईल, अशी माहिती त्यांनी दिली.

गॅरी स्टेडी म्हणाले, कोविड-19चे संकट अद्यापही कायम असल्याने खेळांमध्ये अनेक बदल करण्यात येत आहे. यंदाच्या वर्षाअखेर भारतात टी-20 विश्‍वचषक स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत न्यूझीलंडचा संघ हा 20 खेळाडूंचा ठेवण्याचा विचार करण्यात येत आहे. यामुळे सर्व खेळाडूंची खबरदारी घेण्यास मदत होईल. तसेच युवा खेळाडूंनाही संधी मिळेल. दरम्यान, कोणत्याही स्पर्धेसाठी 15-16 खेळाडूंचा संघस्पर्धेसाठी पाठविण्यात येत असतो.

स्टेड म्हणाले, संभाव्य संघात 20 खेळाडू ठेवल्यास त्या खेळाडूंनाही संधी देता येऊ शकते जे आंतरराष्ट्रीय स्तरावर टी-20 सामने खेळू शकलेले नाहीत. तसेच ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यात सोमवारपासून पाच टी-20 सामन्यांची मालिका सुरू होत आहे. बिग बॅश स्पर्धेत ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी चांगली कामगिरी केली आहे. यामुळे आस्ट्रेलिया संघाचे मनोबल वाढले आहे. या स्पर्धेत न्यूझीलंड नक्‍कीच यश मिळविले, असा विश्‍वास त्यांनी व्यक्‍त केला.

दरम्यान, भारतात दुसऱ्यांदा टी-20 विश्‍वचषक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यापूर्वी 2016 मध्ये या स्पर्धा भारतात यशस्वीपणे पार पडल्या होत्या. तेव्हा वेस्ट इंडिजने विजेतेपदावर नाव कोरले होते. आतापर्यंत झालेल्या 6 टी-20 विश्‍वचषक स्पर्धेत वेस्ट इंडिजने दोनदा चषक पटकाविला आहे. तर भारत, पाकिस्तान, श्रीलंका आणि इंग्लंडने प्रत्येकी एक-एक वेळा अशी कामगिरी केली आहे. मात्र, न्यूझीलंडला अद्यापपर्यंत एकदाही अंतिम फेरीत प्रवेश करता आलेला नाही.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.