वेलिंग्टन – करोनाचा धोका कमी झाल्याने देशात क्रिकेट सामन्यांच्या स्पर्धांचे तसेच सराव सत्राचे आयोजन करण्यास न्यूझीलंड सरकारने क्रिकेट मंडळाला परवानगी दिली आहे. यामुळे आता त्यांना आगामी काळात पूर्वनियोजित पाकिस्तान व वेस्ट इंडिज यांच्याविरुद्धच्या मालिका आयोजित करता येणार आहेत.
मार्च महिन्यापासून जगभरात करोनाचा धोका वाढल्याने अनेक देशांच्या क्रिकेट वेळापत्रकावर परिणाम झाला. त्यातच ऑस्ट्रेलियात येत्या ऑक्टोबरमध्ये होत असलेली विश्वकरंडक टी-20 क्रिकेट स्पर्धाही रद्द झाली. मात्र, युरोपमधील करोनाचा धोका कमी झाल्यानंतर इंग्लंड व वेल्स क्रिकेट मंडळाने मालिकांचे आयोजन केले.
वेस्ट इंडिज, पाकिस्तान व त्यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिका इंग्लंडमध्ये खेळवण्यात आल्या. तसेच आता अमिरातीत आयपीएल स्पर्धाही सुरू झाल्यानंतर न्यूझीलंडला आपल्या मालिकांबाबत आशा वाटू लागली होती. त्यांच्या सरकारनेही मंडळाला परवानगी दिल्याने न्यूझीलंडमधील क्रिकेटलाही प्रारंभ होणार आहे.