नवी दिल्ली – न्यूझीलंडचा स्टार क्रिकेटर आणि विश्वासार्ह फलंदाज रॉस टेलरचा सोमवारी (4 एप्रिल) शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना होता. नेदरलँड्सविरुद्धच्या शेवटच्या एकदिवसीय सामन्यानंतर त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. 15 वर्षे न्यूझीलंडच्या राष्ट्रीय संघाचा भाग असलेला टेलर हॅमिल्टनमध्ये तिसरा एकदिवसीय सामना सुरू होण्यापूर्वीच भावूक झाला होता. राष्ट्रगीत सुरू असताना 38 वर्षीय किवी फलंदाजाला अश्रू अनावर झाले होते.
रॉस टेलरने डिसेंबरमध्ये घोषित केले होते, की तो न्यूझीलंडच्या चालू उन्हाळी हंगामानंतर सर्व प्रकारच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होणार आहे. बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेनंतर टेलरने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आणि आता नेदरलँड्सविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतील सामन्यात त्याची शेवटची खेळी होती. मात्र, शेवटचा सामना रॉससाठी खास नव्हता आणि त्याला 16 चेंडूत 14 धावा करता आल्या.
रॉस टेलरने आपल्या प्रदीर्घ आणि गौरवशाली कारकिर्दीत न्यूझीलंडकडून 450 आंतरराष्ट्रीय सामने (112 कसोटी, 235 एकदिवसीय आणि 102 टी-20) खेळले. यादरम्यान त्याने 18 हजार 199 धावा केल्या, यामध्ये 40 शतकं आणि 93 अर्धशतकांचा समावेश आहे.
2006 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या टेलरने न्यूझीलंडकडून 112 कसोटी सामन्यांमध्ये 7 हजार 683 धावा, 235 एकदिवसीय सामन्यांमध्ये 8 हजार 593 धावा आणि 102 टी-20 सामन्यांमध्ये 1 हजार 909 धावा केल्या. तसेच 2020 मध्ये, टेलर तिन्ही फॉरमॅटमध्ये 100 सामने खेळणारा जगातील पहिला खेळाडू ठरला.