नवी दिल्ली – भारत विरुद्ध न्यूझीलंडमध्ये 18 ते 22 जून दरम्यान साऊथॅम्पटन येथे जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना रंगणार आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघ सज्ज आहेत. लवकरच दोन्ही संघ इंग्लंडचा दौराही करणार आहेत. दरम्यान, या सामन्यासाठी न्यूझीलंडचा फलंदाज डेवॉन कॉनवे अनोख्या पद्धतीने सराव करत आहे.
न्यूझीलंड संघ भारताविरुद्ध कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळण्यापूर्वी इंग्लंडविरुद्ध 2 जूनपासून 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. या सामन्यांपूर्वी कॉनवे खेळपट्टीवर कचरा पसरवून सराव करत आहे. कारण त्याला अपेक्षित आहे की यामुळे भारतीय फिरकीपटूंविरुद्ध खेळण्यास मदत होईल.
कॉनवेने अजून कसोटी पदार्पण केलेले नाही. पण त्याला इंग्लंड दौऱ्यात कसोटी पदार्पण करण्याची संधी मिळू शकते. खेळपट्टीवर कचरा पसरवून सराव करण्यामुळे वेगाने वळण घेणाऱ्या चेंडूविरुद्ध खेळण्यास मदत होईल, असे त्याला वाटत आहे. विशेषत: साऊथॅम्पटनमध्ये फुटमार्कमुळे चेंडू फिरकी घेऊ शकतो, त्यामुळे अशा चेंडूंचा सामना करण्यासाठी तो आधीच तयारी करत आहे.
तो म्हणाला, फिरकी गोलंदाजी खेळणे सोपे नसते. पण जर तुम्ही एक योजना आधीच तयार केली असेल, तर तुम्ही सामन्यात चांगले प्रदर्शन करु शकाल, असे त्याने सांगितले.
कॉनवेने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 3 वनडे आणि 14 टी20 सामने खेळले आहेत. त्याने वनडेत 1 शतक आणि 1 अर्धशतकासह 225 धावा केल्या आहेत. तसेच त्याने आंतरराष्ट्रीय टी20मध्ये 59.12 च्या सरासरीने 4 अर्धशतकांसह 473 धावा केल्या आहेत. त्याची नजीकच्या काळातील कामगिरी पाहाता न्यूझीलंडने त्याला खेळाडूंच्या वार्षिक मानधन कराराच्या यादीत स्थानही दिले आहे.