इंग्लंड – इंग्लंड आणि न्यूझीलंड संघात 3 सामन्यांची कसोटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात इंग्लंडने मोठा विजय मिळवला. उभय संघातील दुसरा कसोटी सामना शुक्रवार, दि. 10 जूनपासून सुरू होणार आहे. मात्र, त्यापूर्वीच न्यूझीलंडला मोठा धक्का बसला आहे. न्यूझीलंडचा अष्टपैलू खेळाडू कॉलिन डी ग्रॅंडहोमने दुखापतीतमुळे मालिकेतून माघार घेतली आहे.
कॉलिन डी ग्रॅंडहोमच्या उजव्या टाचेला झालेल्या दुखापतीमुळे तो इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या कसोटी मालिकेतील उर्वरित सामन्यांमधून बाहेर पडला आहे. लॉर्डसवरील पहिल्या कसोटीत ग्रॅंडहोमला दुखापत झाली होती आणि तो 8-10 आठवडे बाहेर राहू शकतो.
मायकल ब्रेसवेल हा दुखापतग्रस्त हेन्री निकोल्सच्या कव्हर खेळाडूच्या रूपात लंडन येथे न्यूझीलंड संघासोबत आहे. त्यामुळे तो आता संघात कायम राहील.
न्यूझीलंडचे प्रशिक्षक गॅरी स्टीड यांनी सांगितले की, मालिकेच्या सुरुवातीला दुखापतग्रस्त होणे कॉलिनसाठी खूपच निराशाजनक आहे. तो आमच्या कसोटी संघाचा महत्त्वाचा भाग राहिला आहे. तसेच निश्चितच त्याची कमतरता आम्हाला नक्कीच भासेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.