नवी दिल्ली – इंग्लंडचा भारत दौरा रद्द झाल्यानंतर आता न्यूझीलंडच्या “अ’ संघाचाही भारत दौरा रद्द होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. इंग्लंडविरुद्ध भारतीय संघ मायदेशात 6 एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार होता. मात्र, भारतात करोनाचा वाढता धोका लक्षात घेत हा दौरा रद्द झाला आहे.
इंग्लंड संघापाठोपाठ आता न्यूझीलंड क्रिकेट मंडळानेही आपल्या “अ’ संघाचा भारत दौरा अनिश्चित असल्याचे संकेत दिले आहेत. या महिन्यात इंग्लंड व वेस्ट इंडिज यांच्यातील कसोटी मालिकेला प्रारंभ झाला असला तरीही अन्य देशात अद्याप क्रिकेट सुरू झालेले नाही. त्यातच भारतात करोनाचा धोका वाढत असताना आगामी तीन महिने तरी एकही मालिका होणार नसल्याचेही दिसत आहे.