#SLvNZ : श्रीलंकेविरूद्धच्या कसोटीत न्यूझीलंड सुस्थितीत

गॅले – यष्टीरक्षक ब्रॅडली वॅटलिंगने केलेल्या अर्धशतकामुळेच श्रीलंकविरूद्धच्या कसोटीत न्यूझीलंडला दुसऱ्या डावात 7 बाद 195 धावांपर्यंत मजल गाठता आली. या दोन संघांमध्ये सुरू असलेल्या पहिल्या क्रिकेट कसोटीत न्यूझीलंडने तिसऱ्या दिवसअखेर 177 धावांची आघाडी घेतली असून 200 धावांची आघाडीही त्यांना विजय मिळवून देणारी असू शकते.

लंकेने 7 बाद 227 धावसंख्येवर पहिला डाव पुढे सुरू केला. निरोशन दिकवालाने केलेल्या 61 धावांमुळेच त्यांना 267 धावांपर्यंत पोहोचता आले आणि 18 धावांची नाममात्र आघाडी मिळविता आली. त्याने सुरंगा लकमलच्या साथीत आठव्या विकेटसाठी 81 धावांची भागीदारी केली. लकमलने दमदार खेळ करीत 40 धावा जमविल्या. न्यूझीलंडच्या एजाज पटेलने 5 विकेट्‌स घेतल्या.

न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने पुन्हा निराशा केली. त्याला केवळ चारच धावा करता आल्या. त्याच्यासह पहिले तीन गडी 25 धावांत परतले. मात्र टॉम लॅथम (45) व हेन्‍री निकोल्स (26) यांनी 56 धावांची भागीदारी करीत संघाची घसरगुंडी थोपविली. ही जोडी बाद झाल्यानंतर वॅटलिंगने खेळाची सूत्रे स्वत:कडे घेत आत्मविश्‍वासाने खेळ केला. त्याने नाबाद 63 धावा केल्या. टीम साऊथीने 23 धावा करीत वॅटलिंगच्या साथीत 54 धावा जमविल्या.

संक्षिप्त धावफलक –

न्यूझीलंड 249 व 7 बाद 195 (टॉम लॅथम 45, ब्रॅडली वॅटलिंग खेळत आहे 63, लसिथ एम्बुल्डेनिया 4-71, धनंजय डीसिल्वा 2-16) श्रीलंका पहिला डाव 93.2 षटकांत सर्वबाद 267 (निरोशन दिकवाला 61, कुशल मेंडिस 53, अँजेलो मॅथ्युज 50, एजाज पटेल 5-89, विल्यम सोमरविला 3-83)

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.