पंचिंग पासेसचे दर 40 ते 60 रुपयांपर्यंत कमी
पुणे – नवीन वर्षामध्ये पीएमपीच्या प्रवाशांना कमी दरामध्ये महिनाभराचा प्रवास करता येणार आहे. नव्या नियमांतर्गत पंचिंग पासेसचे दर सुमारे 40 ते 60 रुपयांपर्यंत कमी केले आहेत.
पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून देण्यात येणाऱ्या पंचिंग पासच्या दरामध्ये बदल केला आहे. नवीन नियमानुसार पंचिंग पासेससाठी 24 दिवसांऐवजी 22 दिवसांची आकारणी करण्यात येणार आहे, अशी माहिती पीएमपी प्रशासनाकडून देण्यात आली. यामुळे आता प्रवाशांना 22 दिवसांच्या दर आकारणीमध्ये संपूर्ण महिन्याचा प्रवास करणे शक्य होणार आहे.
दि. 1 जानेवारी 2020 पासून या नियमाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. यासह प्रवाशांच्या सोयीसाठी सासवड, उरूळी कांचन आणि राजगुरूनगर येथे पास विक्री केंद्र मंगळवारी (दि. 24) सुरू होणार आहे. यामुळे स्थानिकांना सहज पासेस उपलब्ध होणार आहेत, असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.