पिंपरी, दि. 22 – नववर्षाची सुरुवात मौल्यवान धातू अर्थात सोने-चांदी खरेदी करत पिंपरी-चिंचवडकरांनी केली. जागतिक पातळीवर सुरू असलेल्या अनेक घडामोडींमुळे पुन्हा एकदा सोने आणि चांदी या लाडक्या धातुंची खरेदी गुंतवणूक म्हणून देखील अनेक जणांनी केली. गेल्या काही दिवसांमध्ये सोने आणि चांदीच्या दरात झालेली वाढ आणि भविष्यातही वाढ होण्याची शक्यता पाहता गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर शहरातील बहुतेक सर्व सराफा दुकानांवर ग्राहकांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून आली. यामुळे गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा सोने आणि चांदीच्या विक्रीत तब्बल 20 टक्क्यांची वाढ झाल्याचे सराफा व्यावसायिकांकडून सांगण्यात आले.
अतिशय प्राचीन काळापासून सोन्याने भारतीय नागरिकांच्या मनावर घातलेली भुरळ अजूनही कायम आहे. सोने आणि चांदी हे केवळ दागिने नसून अडी-अडचणीच्या काळात कामी येणारी मौल्यवान ठेव मानली जाते. प्रत्येक सणाला सोने खरेदीला यामुळे एक वेगळेच महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यातल्या त्यात साडे तीन मुहूर्तांपैकी एक असलेला गुढी पाडवा आणि नवीन वर्षांची सुरुवात यामुळे या दिवसाला विशेष महत्त्व आहे. नवीन वर्षाच्या पहिल दिवस आणि साडेतीन मुहुर्तापैकी संपूर्ण एक मुहुर्त असलेल्या गुढी पाडव्याच्या दिवशी सुवर्ण खरेदीची परंपरा आहे. या परंपरेनुसार बुधवारी सकाळपासूनच नागरिकांनी शहरातील विविध सराफांच्या पेढ्यांवर सुवर्ण खरेदीसाठी गर्दी केली होती. संध्याकाळच्या वेळेत या गर्दीमध्ये लक्षणीय वाढ झाली.
केवळ स्त्रियाच नव्हे तर पुरुषांना आजकाल सोने आकर्षित करत आहे. यामुळे वेगवेगळ्या डिझाइनचे ब्रेसलेट, अंगठी आणि सोनसाखळ्यांची मोठ्या प्रमाणात खरेदी झाली. त्यासोबतच हिरे आणि अन्य मौल्यवान खडे देखील या मुहूर्तावर नागरिकांनी खरेदी केले.
गेल्या काही दिवसांमध्ये सोने आणि चांदीना नागरिकांना चांगला मोबदला मिळवून दिला आहे. भविष्यात या मौल्यवान धातुंचे दर आणखी वाढण्याची शक्यता असल्याने मोठ्या प्रमाणावर नागरिकांनी गुढी पाडव्याला खरेदी केली. सोन्या-चांदीचे आकर्षक दागिन्यांसोबतच, वेढणी, हिरे यांना देखील चांगली मागणी होती. गेल्या वर्षीच्या तुलनेत या गुढी पाडव्याला विक्री सुमारे 20 टक्के वाढण्याची शक्यता आहे.
– दिलीप सोनिगरा, उपाध्यक्ष, पिंपरी-चिंचवड ज्वेलर्स असोसिएशन