ठाकरे सरकारची नवी कार्यपद्धती…विकास प्रकल्प लटकवा,अटकवा आणि भटकवा!
आमदार आशिष शेलार यांचा सरकारवर निशाणा
मुंबई : “मेट्रो कारशेड आरेतून कांजुरमार्ग येथे आणण्याबाबात निर्णय ज्या दिवशी ठाकरे सरकारने घेतला त्याच दिवशी आम्ही त्यातील ठाकरे सरकारची अहंकारी वृत्ती मांडली होती. मुंबईकर नागरिकांना मेट्रोमुळे मिळणारा सुखाचा प्रवास यापासून वंचित ठेवण्याचे काम अहंकारी राजा आणि मनमौजी राजपुत्र करत आहेत, असे त्याच दिवशी आम्ही सांगितले होते,” असं म्हणत भाजपा नेते आमदार आशिष शेलार यांनी सरकारवर निशाणा साधला.
आरेला पर्याय म्हणून मेट्रो कारशेडसाठी मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या कांजूरमार्गच्या जागेवर केंद्राने दावा केला आहे. ही जागा आपल्या मालकीची असून, ती मुंबई महानगर क्षेत्रविकास प्राधिकरणाला हस्तांतरित करण्याचा निर्णय रद्द करण्याची सूचना केंद्राने राज्याला केली आहे. त्यामुळे मेट्रो कारशेडच्या जागेवरून केंद्र विरुद्ध राज्य असा संघर्ष निर्माण होण्याचे स्पष्ट संकेत आहेत. यावरून आता विरोधकांनी राज्य सरकारला घेरण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.
तिघाडीच्या ठाकरे सरकारची नवी कार्यपद्धती… विकास प्रकल्प लटकवा, अटकवा आणि भटकवा!
मेट्रो कारशेडचे असेच चालले आहे. pic.twitter.com/Q9RLtedO13— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) November 3, 2020
“मेट्रो कार शेड कांजुरला करण्याचा निर्णय घोषित झाला आहे त्याबाबत सरकारने काही खुलासे करण्याची गरज आहे. असे सांगत आम्ही प्रश्न उपस्थित केले होते. त्याचा डीपीआर झालाय आहे का? त्याचा टेक्निकल स्टडी झाला आहे का? त्याचा ऑपरेशनल प्लॅन तयार झाला आहे का? या तिन्ही गोष्टींचा अभाव असताना केवळ एक वाक्य फेकायचं आणि जनतेला भ्रमित करायचे असे चित्र आहे असे आम्ही सांगितले होते. शून्य पैशांमध्ये जागा ही केवळ घोषणा आहे. कारण ज्या जागेवर प्रस्तावित कारशेडचा मुद्दा राज्य सरकार म्हणते आहे, ती जागा मिठागरांची आहे, त्याबाबत मिठागर आयुक्तांकडून परवानगी घेतल्याचे दिसत नाही, त्यामुळे ती जागा जर राज्य सरकारने आपल्या नावावर केली असेल तर त्याच्या वैधतेवरच प्रश्न निर्माण होते,” असं आशिष शेलार म्हणाले.
डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा