1 एप्रिल 2019 पासून उत्पादित केलेल्या सर्व वाहनांना लागू
गुरूनाथ जाधव
सातारा – वाहन सुरक्षेच्या दृष्टीने 1 एप्रिल 2019 पासून उत्पादित केलेल्या नवीन वाहनांना एचएसआरपी अर्थात हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबरप्लेट बसवण्यात येणार असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय धायगुडे यांनी दिली. एचएसआरपी नंबरप्लेटमुळे गुन्हेगारांना चाप बसणार आहे. अनेक वेळा गुन्हेगार सर्रास नंबर प्लेट बदलून गुन्हा करण्यासाठी वाहनांचा वापर करत असल्याचे निदर्शनास आले आहे. मात्र आता नवीन पद्धतीत त्यांना हे करणे शक्य नसल्याने काही अंशी तरी गैरप्रकारांना आळा घालणे शक्य होणार आहे.
वाहन सुरक्षेच्या दृष्टीने केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्ग मंत्रालयाने वाहनांना “हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट’ बसवण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय मोटारवाहन नियम 1989 च्या नियम 50 अनुसार वाहनांवर “एचएसआरपी’ बसवण्यात येणार आहे. या पद्धतीची नंबरप्लेट असल्याची खातरजमा करूनच वाहनांची नोंदणी करण्याचे आदेश परिवहन आयुक्त कार्यालयाने दिले आहेत. परिवहन आयुक्तांचे तसे आदेश जारी झाले असुन त्यांची कार्यवाही 1 एप्रिल पासून सुरू झाली आहे.
वाहनाच्या डिलरकडून अथवा वाहन उत्पादकांच्या मार्फत या नंबर प्लेट “एचएसआरपी’ची अंमलबजावणी नवीन वाहनासाठी करण्यात येणार आहे. वाहनांना या नंबरप्लेट लावल्यानंतरच याची नोंदणी प्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये होणार आसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. एचएसआरपीची नंबरप्लेट पुढील प्रमाणे असणार आहे. यामध्ये “हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट्स’ अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने बनवण्यात येणार असून त्या “टॅम्परप्रूफ’ असणार आहेत. या नंबर प्लेटवर निळ्या रंगाच्या चक्राचे “थ्रीडी’ होलोग्राम असणार आहे. त्याचबरोबर वाहन क्रमांकाच्या खाली तिरप्या ओळीत “इंडिया’ असे लिहिलेले असेल.
“हॉट स्टॅम्पिंग’ आणि “स्नॅप लॉक’ ही या प्लेटची वैशिष्ट्ये आहेत. प्रादेशिक परिवहन कार्यालय आणि वाहतूक पोलिसांनी बारकोड स्कॅन केल्यास वाहनांची पूर्ण माहिती उपलब्ध होणार आहे. यामध्ये अद्याप तरी जी जुनी वाहने आहेत. त्यांच्या बाबतीत कोणत्याही प्रकारची भूमिका घेतली नाही. नागरिकांनी याबाबत न घाबरता नव्याने घेण्यात आलेल्या वाहनांनाच एचएसआरपी नंबर प्लेट मिळणार आहे.
सातारा शहरातील रेडियम नंबर प्लेट बनविणाऱ्या व्यावसायिकांनी आपली कैफियत निवेदनाद्वारे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्याकडे निवेदन देऊन केली. त्यांत आमच्या पोटावर या एचएसआरपी नंबर प्लेटमुळे पाय येणार असल्याने आमच्या व्यवसायावर संक्रात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. शासनाने आमच्यासारख्या अनेक व्यावसायिकांना या नंबर प्लेट बनविण्याचे काम देऊन आम्हाला बेरोजगारीपासून वंचित होण्यापासून वाचवावे तसेच आम्हाला या नंबर प्लेट बनविण्याच्या प्रक्रियेत सामावून घ्यावे असे शासनदरबारी मागणे मांडावे, असे आवाहन सर्व रेडियम नंबर प्लेट बनविणाऱ्या व्यावसायिकांनी केले आहे.