वारजे माळवाडी पोलीस लाचप्रकरणास नवे वळण

गुन्हे शाखेतील दोघे “बेशिस्त’ निलंबित

पुणे – वारजे माळवाडी पोलीस ठाण्यातील लाचखोरी प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने पोलीस कर्मचारी विलास तोगे आणि खासगी व्यक्ती बाळासाहेब चव्हाण यांच्यावर कारवाई केली होती. तर याच प्रकरणात सहभागी असल्याचा ठपका ठेवत गुन्हे शाखेतील सहायक पोलीस फौजदार प्रकाश मोकाशी व पोलीस नाईक संदीप साबळे यांना पोलीस आयुक्तांनी निलंबित केले आहे.

जप्त केलेला डीव्हीआर परत देण्यासाठी तोगे आणि चव्हाण यांनी लाच घेतली होती. पण, गरज नसताना तो जप्त केल्याचा ठपका मोकाशी व नाईक यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

या कारवाईत मोकाशी आणि साबळे यांचा लाच प्रकरणात हात असल्याचे म्हणण्यात आले आहे. ज्या प्रकरणात कारवाई करुन फिर्याद नोंदवली, त्याच प्रकरणात या दोघांना निलंबित करण्यात आले आहे. “…तुम्ही पोलीस दलाच्या शिस्तीत बाधा आणणारे आणि अशोभनीय वर्तन केले आहे,’ असे या नोटिशीत म्हटले आहे.

मोकाशी, साबळेने लाच मागण्यास भाग पाडले
चहा विक्रेत्याकडे गुटखा न सापडल्याने मोकाशी आणि साबळेने त्याला मारहाण केली. त्यावेळी चहा विक्रेत्याने ओळख असल्याने तोगेला बोलावून घेतले. तोगे, बाळासाहेब, मोकाशी आणि साबळे यांनी तक्रारदाला बाहेर पाठवून चर्चा केली. काही वेळानंतर चहाविक्रेत्याला बोलावून तोगेने 50 हजार रुपये आणण्यास सांगितले. मात्र, एवढे पैसे जवळ नसल्याचे चहा विक्रेत्याने त्यांना सांगितले. यावर गुन्हा दाखल करुन आत टाकण्याच्या धमकी देण्यात आली. यामुळे चहाविक्रेत्याने 38 हजार रुपये बाळासाहेबला दिले.

यानंतर चहाविक्रेत्याला “तुझ्यावर साधा गुन्हा दाखल करतो’ असे सांगण्यात आले. बाकीच्या 12 हजारांसाठी बाळासाहेब तक्रारदाराला सतत कॉल करत होता. “पैसे दिले नाही, तर डीव्हीआरमधील तू गुटखा विकत असल्याचे चित्रण न्यायालयाला दाखवेल’ असा दम देण्यात आला होता. मात्र, वैतागून चहाविक्रेत्याने तक्रार केली.

प्रकरण काय?
मोकाशी आणि साबळे यांनी चहाच्या दुकानदारावर तंबाखुजन्य पदार्थ विक्री केल्याप्रकरणी कारवाई केली होती. याप्रकरणात सीसीटीव्हीचा डीव्हीआर जप्त करण्यात आला होता. हा डीव्हीआर वारजे माळवाडी पोलिसांच्या ताब्यात देऊन चहा विक्रेत्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणात पोलीस कर्मचारी तोगे याने बाळासाहेब नावाच्या खासगी व्यक्तीमार्फत चहा विक्रेत्याकडे 50 हजारांची लाच मागितली होती. यातील 38 हजार रु. स्वीकारल्यानंतर उर्वरित 12 हजारांसाठी त्यांनी तगादा लावला होता. चहा विक्रेत्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केल्यावर तोगे आणि बाळासाहेबवर कारवाई करण्यात आली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.