नवा ट्रेंड सुरु, जेलमध्ये असणाऱ्यांकडून पत्र लिहून घ्यायचे : संजय राऊत

मुंबई – मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी टाकलेल्या लेटर बॉम्बचे पडसाद अद्याप शमलेले नाहीत. तोच सचिन वाझेंनेही एक लेटर बॉम्ब टाकला आहे. या पत्रात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह परिवहनमंत्री अनिल परब यांच्यावरही गंभीर आरोप केले आहेत. या आरोपांवर अनिल परब यांनी स्पष्टीकरण दिले आहे. यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

संजय राऊत म्हणाले कि, महाराष्ट्र सरकारला अस्थिर करण्याचा प्रयत्न पहिल्या दिवसापासून सुरु आहे. अशातच एक नवा ट्रेंड सुरु झाला आहे जेलमध्ये असणाऱ्यांकडून पत्र लिहून घ्यायचे आणि सरकारविरोधात आवाज उठवायचा. असे असेल तर जेलमध्ये अजूनही अनेक लोक आहेत. त्यांच्याकडूनही खूप काही लिहून घेतले जाऊ शकते. या प्रकारचे घाणेरडे राजकारण या देशात आणि राज्यात याआधी झालेले नाही.

या प्रकरणामध्ये अनिल परब यांचे नाव समोर आले आहे. अजित पवार, अनिल देशमुख यांचे नाव आले आहे. गुन्हा केल्याने अटकेत असलेल्या आरोपीकडून जेलमध्ये लिहून घेतले जाते आणि तो पुरावा म्हणून समोर आणले जाते. हे राजकीय षडयंत्र आहे. मी अनिल परब यांना ओळखतो. अशा कामांत ते कधीच नसतात. अनिल परब यांनी बाळासाहेबांची शपथ घेऊन काही गोष्टी स्पष्ट केल्या आहेत. खरा शिवसैनिक हा दुसरे काही करेल पण बाळासाहेब ठाकरेंची खोटी शपथ घेऊन काही करणार नाही. माझा अनिल परब यांच्यावर विश्वास आहे, असेही संजय राऊत यांनी म्हंटले आहे.

राष्ट्रीय तपास यंत्रणा आपण ज्यांना म्हणतोय त्यांच्यासाठी विरोधी पक्ष गालीचे अंथरत आहे हे दुर्दैव आहे. महाराष्ट्राच्या सरकारला जर कोणी अशा प्रकारे कोंडीत पकडून अस्थिर करण्याचे डावपेच करत असतील तर यशस्वी होणार नाही, अशी टीकाही संजय राऊत यांनी केली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.