नेवाशात भाजप अंतर्गत नवा-जुना वाद उफाळणार

गणेश घाडगे
जुन्यांकडून माजी खा. गांधी, देसरडांची नावे पुढे ः नवे मुरकुटेंसाठी प्रयत्नशील
 
नेवासा – 2014 च्या विधानसभा निवडणुकीत माजी आमदार शंकरराव गडाख यांना विरोध करत सर्वसामान्य कुटुंबातील भाजपात अचानक प्रवेश केला. तसेच गडाख यांच्या सर्व विरोधकांनी एकत्र येत मुरकुटे यांना आमदारकी बहाल केली. मात्र 2014 च्या विधानसभा निवडणुकीनंतर आ. मुरकुटे यांनी भाजपत आपला स्वतंत्र गट स्थापन करत जुन्या कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडले. त्यामुळे नव्या-जुन्या कार्याकर्त्यांत खदखत आहे. त्यामुळे आता हेच जुने कार्यकर्ते आ. मुरकुटे यांच्या उमेदवारीस विरोध दर्शवित असून, त्यांच्याकडून माजी खासदार दिलीप गांधी व भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष सचिन देसरडा यांची नावे पुढे केली जात आहेत.

तालुक्‍यात सध्या आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्या उमेदवारीवरून भाजप अंतर्गत जुना-नवा वाद उफाळण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे. त्यातच माजी खा. दिलीप गांधी देखील नेवासा विधानसभा मतदारसंघातून इच्छुक असल्याचे एका जुन्या कार्यकर्त्याने दैनिक प्रभातशी बोलताना सांगितले. भाजपतील जुन्या-नव्या कार्यकर्त्यांचा वाद सोशल मीडियावर सध्या तरी टोकाला गेला असल्याचे पहायला मिळत आहे. ते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करून आपलाच नेता कसा सक्षम आहे, हे पटवून देत आहेत. विद्यमान आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी जिल्हा परिषद व अन्य निवडणुकीत भाजप व शिवसेनेच्या कार्यकर्त्यांव्यतिरिक्त राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना बळ देत आपल्याच पक्षाच्या जुन्या कार्यकर्त्याचा पराभव केल्याचा आरोप देखील भाजप निष्ठावंत व शिवसैनिक करत आहेत.

आमदार मुरकुटे यांच्या निकट असलेल्या पदाधिकाऱ्यांनी तालुक्‍यातील विकासकामांचे उद्‌घाटन किंवा इतर कार्यक्रमांत निष्ठावंतांना जाणीवपूर्वक डावलले. त्यामुळे त्यांच्यात खदखद आहे. ही खदखत आता 2019 च्या विधानसभा निवडणुकीत बाहेर निघण्याची शक्‍यता आहे. नेवासा तालुका मोदी लाटेवर स्वार झाला आहे. तालुक्‍यात दोन (घुले-गडाख) साखर सम्राट असल्याने या दोन्ही गटांकडे कार्यकर्त्यांचा मोठा लवाजमा आहे.

मोदी लाटेला थोपवण्यासाठी दोन्ही गट काय भूमिका घेणार? हे देखील महत्त्वाचे असल्याने तालुक्‍याचे त्यांच्या निर्णयाकडे लक्ष लागले आहे. आमदार मुरकुटे यांना मोदी लाटेचा व घुले बंधूच्या पाठिंब्याचा फायदा झाला असल्याचा आरोप देखील आमदार गडाख यांनी वेळोवेळी केलेला आहे. त्यामुळे घुले-गडाख वाद पेटला आहे. या वादामुळे विधानसभेचे पुढील राजकीय समीकरणे जुळवणे अवघड असल्याचे चित्र सध्या तरी सर्वच राजकीय नेत्यांना जिकरीचे असल्याचे बोलले जात आहे.

गांधींच्या उमेदवारीची नेवाशात ठिणगी
माजी खा. दिलीप गांधी यांचा मागील महिन्यात वाढदिवस साजरा झाला. नेवाशातील भाजपला व त्यांना मानणारे कार्यकर्ते खास करून हजर होते. यावेळी अनेकांनी गांधी यांनी येथून निवडणूक लढवावी, अशी पोटतिडकीने भावना मांडली अन्‌ गांधी यांच्या खासदारकीची उमेदवारी कापल्याची खदखद मोकळी केली. तसेच मी उमेदवारी करावी ही कार्यकर्त्यांची इच्छा असल्याचे गांधी यांनी बोलून दाखवले. नेवासा मतदारसंघ नगर दक्षिण मतदारसंघात होता, त्यावेळी विकास कामांच्या माध्यमातून जनतेशी त्यांनी आजही संपर्क ठेवला आहे.

आमदार गडाखांची भाजप प्रवेशाची चर्चा
नेवासा तालुका मोदी लाटेवर स्वार असल्याचे बोलले जाते. 2014 च्या निवडणुकीत मोदी लाटेत आमदार बाळासाहेब मुरकुटे यांची लॉटरी लागली. 2019 लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला आणि अनेकांनी भाजपचे दार ठोठावण्यास प्रारंभ केला आहे. त्यातच माजी आमदार शंकरराव गडाख यांचे भाजपातील वरिष्ठ नेत्याशी मैत्रीचे संबंध असल्याने विधानसभा निवडणुकीत गडाख देखील भाजपचे उमेदवार असू शकतील, अशी चर्चा सध्या तालुक्‍यात जोर धरू लागली आहे.

क्षितिज घुलेंची नेवाशातील कार्यक्रमांना हजेरी
ज्ञानेश्वर कारखाना व घुले बंधूंची स्वतंत्र यंत्रणा असून, त्यांना मानणारा कार्यकर्त्यांचा मोठा गट तालुक्‍यात आले. सध्या निवडणुकीला अवधी असला, तरी माजी आमदार नरेंद्र घुले यांचे चिरंजीव क्षितिज घुले यांनी नेवासा तालुक्‍यातील कार्यक्रमांना हजेरी लावण्यास सुरुवात केल्याने घुले समर्थकांच्या देखील भुवया उंचावल्या आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.