२१, ७३, ९२ नव्हेतर ‘वीस एक, सत्तर तीन, नव्वद दोन’

दुसरीसाठी यंदापासून नवीन अभ्यासक्रम

पुणे – महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळातर्फे (बालभारती) यंदाच्या वर्षापासून इयत्ता दुसरीच्या अभ्यासक्रमात बदल केला असून त्याची अंमलबाजवणीही सुरू करण्यात आली आहे. गणित विषयाच्या पुस्तकात आमूलाग्र बदल करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना समजण्यासाठी संख्या वाचनात बदल करण्यात आला आहे. आता एकवीसऐवजी “वीस एक’, त्र्याहत्तरऐवजी “सत्तर तीन’, ब्याण्णवऐवजी “नव्वद दोन’ असे वाचण्याच्या सूचना मंडळाने दिल्या आहेत. यावरून आता मते-मतांतरे व्यक्‍त होत असून यावर बालभारती आणि शिक्षण विभागाने त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे.

“बालभारती’च्या वतीने सन 2019-20 या चालू शैक्षणिक वर्षापासून इयत्ता दुसरी व अकरावीसाठी नवीन अभ्यासक्रम लागू केला आहे. दररवर्षी कोणत्याही इयत्तेचा अभ्यासक्रम बदलला, की त्याबाबत तज्ज्ञांकडून उलट-सुलट चर्चाही सुरू होते. यंदाही नुकत्याच शाळा सुरू झाल्या असून इयत्ता दुसरीच्या गणित विषयाच्या अभ्यासक्रम बदलाबाबत चर्चा रंगू लागली आहे. अकरावीची अद्याप प्रवेश प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अकरावीच्या अभ्यासक्रमाबाबतही तज्ज्ञांकडून आपापल्या पद्धतीने मते व्यक्‍त केली जाणार हे स्पष्ट आहे.

दुसरीच्या गणिताच्या पुस्तकात
21 ते 99 या संख्याचे वाचन व शब्दांत लेखन यात बदल करण्यात आला आहे. जोडाक्षरे नको म्हणून पाढे पठणाची व लिहिण्याची पद्धतच बदलली आहे. पुस्तकात नवी व जुनी पद्धत अशा दोन्ही पद्धती देण्यात आलेल्या आहेत. शिक्षकांनी नवीन पद्धतीने शिकवावे, अशा सूचनाही करण्यात आल्या आहेत.

विद्यार्थ्यांना गणित हा विषय नेहमीच अवघड वाटतो, त्याबद्दल भीतीदेखील असते. ती दूर करण्यासाठी सर्वांनीच पुढाकार घ्यायला पाहिजे. इयत्ता दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठी नवीन अभ्यासक्रमातील गणित विषयातील बदल हा विद्यार्थ्यांच्या फायद्यासाठीच आहे. नवीन पद्धती विद्यार्थ्यांना लक्षात ठेवण्यासाठी सोपी आहे. याला कोणत्याही पालकांकडून विरोध झालेला नाही.
– शामल जाधव सरस्वती विद्यालय, दत्तनगर


इयत्ता दुसरीच्या मराठी, गणित, इंग्रजी या विषयांच्या अभ्यासक्रमात बदल झाला आहे. या प्रत्येक विषयातील धडे कमी करण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांना गणितातील जोडाक्षरे लिहिणे व लक्षात ठेवणे अवघड जाते. प्रामुख्याने 40 संख्येच्या पुढील जोडाक्षरे समजणे कठीण जात असते. त्यामुळे संख्या वाचन व लिहिण्याच्या पध्दतीत करण्यात आलेला बदल योग्य आहे. ही पध्दत खूप सोपी आहे. यामुळे एकक व दशक विद्यार्थ्यांना सहजासहजी समजणार आहेत. विद्यार्थ्यांना दोन्ही पद्धती शिकविल्या जाणार असून परीक्षेत कोणतीही एक पध्दत विद्यार्थ्यांना वापरता येणार आहे. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेकडून शिक्षकांना प्रशिक्षण मिळाल्यानंतर शिक्षकांना शिकविताना येणाऱ्या अडचणी दूर होतील.
– पोपट आदक, गणित शिक्षक, मॉडर्न प्राथमिक शाळा

शैक्षणिक प्रगतीसाठी बदल आवश्‍यकच
शैक्षणिक प्रगती व्हावी असा विचार करूनच अभ्यासक्रमात बदल करण्यात येत असतात. नवीन बदल स्वीकारल्यास फायदाच होणार आहे. इयत्ता दुसरीतील विद्यार्थ्यांना सोप्या पद्धतीने गणितातील अंक समजून सांगण्यासाठीच बदल करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांच्या मनातील संभ्रम व भीती दूर होण्यासाठी नव्या पद्धतीची मदतच होणार आहे.
गेल्या वर्षी इयत्ता पहिलीसाठी हा प्रयोग राबविण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना जी सोपी वाटते ती पद्धत त्यांना वापरण्याची मुभा देण्यात आलेली आहे. नवीन पद्धतीबाबत अद्यापर्यंत कोणीही आक्षेप किंवा विरोध नोंदविलेला नाही, असे बालभारतीचे संचालक डॉ. सुनील मगर यांनी सांगितले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.