करोनाचा धोका असल्याने लांबणीवर टाकण्यात आलेली ऑलिम्पिक स्पर्धा आता कोणत्याही जर तरचे प्रश्न निर्माण न होता रंगणार आहे. या स्पर्धेसाठी नव्याने करोडो डॉलर्सचा खर्च कसा करणार ही विवंचनाही आता संपुष्टात आली आहे. आयोजकांकडून स्पर्धेचे अधिकृत काउंटडाऊन सुरू करण्यात आले आहे. क्रीडाज्योतीची फेरी देखील जपानमधील जवळपास 900 शहरांत दाखल होणार आहे.
करोनाचा धोका निर्माण झाल्यामुळे यंदा होणारी ही स्पर्धा पुढील वर्षांपर्यंत लांबणीवर टाकली गेली. आता मात्र, स्पर्धेबाबतचे सर्व अडथळे दूर झाले असून जपान सरकार, आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संघटना व जपान ऑलिम्पिक संघटना यांनी स्पर्धेच्या जय्यत तयारीलाही वेग दिला आहे. जपानच्या सर्वसामान्य नागरिकांवर या स्पर्धेच्या अतिरिक्त खर्चाचा बोजा पडणार होता. पण आता स्पर्धेच्या प्रायोजकांनीही वाढीव रकमेची तरतूद केल्यामुळे सर्व भार हलका झाला आहे. या स्पर्धेला प्रचंड यश मिळेल व स्पर्धेच्या फेरनूतनीकरणाचेही काम वेळापत्रकानुसार पूर्ण होईल यात आता शंका घेण्याचे कारण नाही.
ऑलिम्पिक क्रीडा ज्योतीची फेरीही लवकरच देशभरात विविध शहरांमध्ये दाखल होणार आहे. ही ज्योत फुकुशिमा येथून 10 हजार खेळाडूंच्या सहभागाने एखाद्या रॅलीसारखी सुरू होणार आहे. टोकियोत ही ज्योत प्रमुख स्टेडियमवर प्रज्वलितही करण्यात आली आहे. ऑलिम्पिक स्पर्धा या जागतिक क्रीडाक्षेत्राच्या मानबिंदू असतात. जगातील क्रीडा क्षेत्राचा हा महाकुंभमेळा आता निर्विघ्नपणे पार पडेल याची साक्ष मिळत असतानाच खेळाडूंसाठी ही नामी संधी आहे. आपली कारकीर्द घडवताना प्रत्येकाला ऑलिम्पिक स्पर्धेत आपल्या देशाकडून खेळण्याचे व यश मिळवण्याचे स्वप्न असते.
ही स्पर्धा अनेकांच्या पंखांना भरारी देण्याचे काम करते म्हणूनच कितीही यश मिळवले व कोणत्याही स्पर्धेचे पदक मिळवले तरीही ऑलिम्पिक पदक हे जागतिक वर्चस्व ठरते, हे नव्याने सांगण्याची गरज नाही. असो, या स्पर्धेवरचे सर्व मळभ दूर झाले असून उगवत्या सूर्याच्या देशात स्पर्धेतील कामगिरीद्वारे नव्या ताऱ्यांचाही उदय होणार आहे व आपण त्याचे साक्षीदारही बनणार आहोत.