नवी दिल्ली – देशाची राजधानी दिल्लीत नव्या संसद भवनाच्या बांधकामाचा प्रारंभ चालू वर्षीच्या डिसेंबरपासून होणार आहे. ते काम ऑक्टोबर 2022 पर्यंत पूर्णत्वास जाईल, अशी माहिती शुक्रवारी लोकसभा सचिवालयाकडून देण्यात आली.
लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांच्या अध्यक्षतेखाली नवे संसद भवन उभारण्यासाठीच्या तयारीचा आढावा घेण्यात आला. त्यानंतर सुमारे दोन वर्षांत नवे संसद भवन सज्ज होण्याविषयीचा विश्वास व्यक्त करण्यात आला. बांधकामावेळी हवा आणि ध्वनी प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी पुरेशा उपाययोजना केल्या जातील.
नव्या संसद भवनात सर्व खासदारांसाठी डिजिटल सुविधांनी युक्त स्वतंत्र कार्यालये असतील. कार्यालये पेपरलेस बनवण्याच्या दिशेने ते एक पाऊल ठरेल. नव्या इमारतीत भारतीय लोकशाही वारशाचे दर्शन घडवणारा भव्य कॉन्स्टिट्यूशन हॉल उभारला जाणार आहे. त्याशिवाय, खासदारांसाठी लाऊंज, ग्रंथालय, विविध समित्यांसाठी दालने, भोजनकक्ष आणि पुरेशी पार्किंग व्यवस्था केली जाईल.
नव्या इमारतीमधील लोकसभा सदनात 888 खासदारांसाठी, तर राज्यसभा सदनात 384 खासदारांसाठी आसनव्यवस्था असेल. सध्या लोकसभेचे संख्याबळ 543 तर राज्यसभेचे संख्याबळ 245 इतके आहे. भविष्यात खासदारांची संख्या वाढण्याची शक्यता गृहीत धरून आसनव्यवस्था केली जाणार आहे.