आजच्या युगातले नवे नियम

सुलभा आणि स्मिता दोघी बहिणीची घरे ही जवळजवळ होती. त्यामुळे एकमेकींकडे जाणे येणे, नेहमीच चालू असे. एखादा पदार्थ पोचविणे, एकत्र कार्यक्रमांना जाणे, फिरायला जाणे अशी दोघी बहिणींची खास मैत्री आणि प्रेम होते. स्मिता एकदा आली असताना दोघी गप्पा मारत होत्या आणि बोलता बोलता चातुर्मास जवळ आल्याने दोघींनाही त्यांच्या आईची आठवण आली. आई आणि मावशीही कसे नियम करायच्या. गोपद्म काढायचे, ज्ञानेश्‍वरी, दासबोध वाचनाचे, कीर्तनाला जाण्याचे आणिक किती तरी. सुलभा स्मिताला म्हणाली, आपण ही करू या का असे नियम यावर्षी.

सुलभाची कॉलेजमध्ये नुकतीच जाऊ लागलेली नात ईशा हे ऐकत होती. तिने लगेच विचारले, ऐ आजी कसले गं नियम करत आहात? मी तुम्हाला सांगू का काही वेगळे नियम- तू बोलू नकोस गं मध्ये म्हणेपर्यंत ही हसत हसत म्हणाली की, असे नियम करा की सगळ्यांना त्याने छान वाटेल, म्हणजे –
– रोज एका मैत्रिणीला पाणीपुरी खायला घेऊन जा.
– चार महिन्यांत चार मराठी सिनेमे आणि नाटके पाहा.
– चार महिन्यांसाठीचे नेट पॅक सुरुवातीलाच भरून ठेवा.
– रोज सकाळी whatsapp मैत्रिणींना गुडमॉर्निंगचे मेसेज पाठवा.
– U Tube वरून नवीन गोष्टी शिकून घ्या.
– फेसबुक जॉईन करा- लोकांना लाईक करा.
– चार महिन्यांत दोन तरी मोठ्या आणि दोन छोट्या सहलींना जा.
– रोज नवनवीन पदार्थ करून नातींना खायला घाला.
– पोटाला त्रास होणार नाही एवढे हॉटेलिंग करा.
– तब्येतीची काळजी घ्या आणि आजारी पडू नका.
– ईशाचे नवीन नियम ऐकून दोघी बहिणी हसू लागल्या. अगं आजी म्हणजे मैत्रिण आहे का तुझी? काय हे तुझे नियम. तूच – कर ते आणि बरं कां गं आम्ही ठरविले आहेत आमचे नियम-
– रोज सकाळी पाऊस असला तरी आम्ही फिरायला जाणार.
– रोज अर्धा तास तरी वेगळा व्यायाम किंवा हास्यक्‍लबला जाणार.
– नवनवीन मराठी आणि इंग्लिश पुस्तकेदेखील वाचणार.
– दोन तरी सहलींना नक्की जाणार.
– मैत्रिणींचे गेट-टू-गेदर ठरविणार आणि खूप गप्पा आणि हसून दिवस आनंदात घालविणार.
– प्रत्येक महिन्याला एक याप्रमाणे चार तरी झाडे लावणार त्याचे संगोपन करून एकमेकांना भेट देणार.
– पाणी वाचविण्यासाठी प्रयत्न करणार. शिळे पाणी फेकून न देता झाडांना घालणार.
– प्लॅस्टिकचा वापर कमी करणार. भाजीसाठी कापडी पिशवी वापरणार.
– Whatsapp आणि स्मार्ट फोन गरजेपुरता नक्कीच वापरणार कारण तो उपयोगी आहे. पण सतत त्यातच रमणार नाही.
– गाण्याच्या, करमणुकीच्या कार्यक्रमांना जाणार.
– आरोग्य चांगले राखण्याचा प्रयत्न करणार.
आणि हो घरातही छान पदार्थ करून तुम्हाला खायला घालणार, तुझ्या आईलाही हो-

अगं ईशा, चातुर्मास हे निमित्त आहे आणि यामध्ये “नियम’ करायचे म्हणजे काय आपलीच आपल्याला थोडी शिस्त लावायची. पूर्वी बायका देवाधर्माचे नियम करायच्या कारण बाहेरचे जग त्यांनी फार पाहिले नव्हते. आता मी आणि तुझी मावशी आजी नोकरीतून सेवानिवृत्त होऊन, आयुष्यभर स्वतःच्या पायावर आणि निर्णयावर राहिलो आहोत. आमचे नियम आजच्या काळाला अनुसरून आहेत. शेवटी काय गं, चांगलं वागायचं, चांगलं रहायचं, चांगलं बोलायचं हा तर सर्वांनीच आयुष्याचा नियम करायला हवा. सर्वांनी एकमेकांवर प्रेम करावं. कटुता विसरावी, स्नेह वाढवावा यापेक्षा वेगळं काय मिळवायचं असतं गं. पण तुझा तो “पाणी-पुरी’चा नियम मात्र मला फार आवडला. चल आजच जाऊ या तू, मी आणि मावशी, आजी.

– आरती मोने

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here