पुन्हा खड्ड्यांचा सामना…पुण्यात यंदा नवीन रस्त्यांना “ब्रेक’

पथ विभागाच्या निधीला 90 टक्के कात्री : गरजेनुसार फक्त 10 टक्के खर्चास मुभा

पुणे – गल्ली-बोळांतील रस्त्यांचे कॉंक्रीटीकरण, गरज नसतानाही वारंवार होणारे डांबरीकरण अशा अनावश्यक कामांना यंदा “ब्रेक’ लागणार आहे. सोबतच नवीन रस्तेही यंदा न करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे.

करोनामुळे गेल्या आठ महिन्यात महापालिकेचे उत्पन्नाचे स्त्रोत घटल्याने पालिकेसमोर वर्षा अखेरीस निधीची चणचण असणार आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. तर, मार्चअखेर केवळ रस्त्यांची डागडुजी केली जाणार आहे. त्यासाठीही अंदाजपत्रकाच्या एकूण तरतुदीपैकी केवळ 8 ते 10 टक्केच निधी या विभागास मिळणार आहे. पथ विभागास दरवर्षी अंदाजपत्रकात सुमारे 400 ते 500 कोटी रुपयांचा निधी दिला जातो. त्यात प्रामुख्याने रस्त्यांची दुरूस्ती, नवीन रस्ते, कॉंक्रीटीकरण, रिसर्फेसिंग, खड्डे-पदपथ दुरुस्ती अशा प्रमुख कामांचा समावेश असतो. त्यातही पदपथ दुरुस्ती आणि कॉंक्रीटीकरणासाठी अक्षरश: उधळपट्टी केली जाते.

 

मात्र, यंदा लॉकडाउनमुळे महापालिकेस उत्पन्नात मोठी तूट आली आहे. सध्या फक्त मिळकतकर आणि जीएसटीच्या अनुदानातून मिळणाऱ्या उत्पन्नावरच पालिकेचा आर्थिक गाडा सुरू आहे. करोनासाठी गेल्या आठ महिन्यात पालिकेचा मोठा खर्च झाला आहे. त्यामुळे नवीन भांडवाली कामांना प्रशासनाने कात्री लावली आहे.

 

लॉकडाऊमुळे मार्चपासूनच वर्दळ कमी होती. पावसाळ्यातही वाहनांची संख्या कमी असल्याने रस्त्यांची स्थिती दरवर्षीच्या तुलनेत बरी आहे. त्यामुळे यंदा पथ विभागाच्या तरतुदीला तब्बल 90 टक्के कात्री लावली आहे. तर, 10 टक्के खर्चही तातडीच्या डागडुजीसाठी केला जाणार आहे.

 

लॉकडाउनमुळे नवीन कामे सुरू करण्यात आली नसली, तरी रस्त्यांची देखभाल-दुरूस्ती सुरू आहे. मार्च 2021 अखेर जसजशी तरतूद उपलब्ध होईल, त्यानुसार कामांचा प्राधान्यक्रम ठरवून कामे करण्यात येतील.

– व्ही. जी. कुलकर्णी, पथ विभाग प्रमुख.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.