वारंवारच्या खोदकामामुळे रस्ताच व्हेंटिलेटरवर
रस्ता एकच..पण, सिमेंट आणि डांबराचा
पुणे -शहरातील बहुतांश रस्त्यांची पुरती वाट लागली आहे. अरण्येश्वर चौकाजवळील शिवदर्शन चाळ भागात रस्त्याचा नवा “पुणेरी पॅटर्न’ पाहण्यास मिळत आहे.
शिवदर्शन चाळ भागातील मुख्य रस्ता सध्याच्या घडीला व्हेंटिलेटरवरच असल्याचे दिसून येते. हा रस्ता एकच असून निम्मा रस्ता डांबरी तर निम्मा रस्ता सिमेंट कॉंक्रीटचा केल्याचे धक्कादायक चित्र दिसून आले आहे. वारंवार केलेल्या खोदकामामुळे रस्त्यात ठिकठिकाणी खड्डे पडले असून, दुचाकीस्वार घसरून पडण्याचा धोका निर्माण झाला आहे.
रस्ता व गटाराची झाकणेही समपातळीत नाहीत. त्यामुळे मोठा अपघात होण्याची भीती आहे. मयुरेश भावे हा वाहनचालक म्हणाला, “मुक्तांगण शाळेजवळील रस्त्याचा काही भाग सहा-सात महिन्यांपूर्वी खोदण्यात आला. तीन-चार वेळा तो खोदला गेला, मात्र दुरुस्ती शास्त्रशुद्ध पद्धतीने करण्यात आलेली नाही.’
भार्गवी नलावडे म्हणाल्या, “या रस्त्याला रस्ता तरी कसा म्हणावा, हा प्रश्न पडतो. या रस्त्यापेक्षा खेड्यातील कोणताही रस्ता उत्तम असेल. शहरात जाणारा प्रमुख रस्ता असूनही याकडे दुर्लक्ष होत आहे.’
सदर रस्त्याची डागडुजी करून बुधवारपर्यंत (दि. 11) खड्डे बुजवण्यात येतील. सिमेंट कॉंक्रीटमध्ये पडलेल्या भेगाही बुजवल्या जाणार असून वाहनचालकांना धोका उद्भवणार नाही, याकडे पाहिले जाईल.
– जयंत भोसेकर, उपायुक्त, परिमंडळ क्र. 3