Maharashtra Congress President : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली पक्षाला राज्यात लोकसभेला मोठे यश मिळाले होते. मात्र, त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारूण पराभव झाला. तेव्हापासूनच काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष बदलणार का? अशी चर्चा सुरू झाली आहे. विद्यमान प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी यापूर्वीच आपल्याला जबाबदारीतून मुक्त करावी, अशी विनंती वरिष्ठ नेत्यांना केली आहे.
काँग्रेसला राज्यात लवकरच नवीन प्रदेशाध्यक्ष मिळण्याची शक्यता आहे. याबाबत स्वतः नाना पटोले यांनी माहिती दिली. नागपूरमध्ये बोलताना पटोले यांनी सांगितले की, काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याशी या संदर्भात बोलणं झाले असून या आठवड्यात प्रदेशाध्यक्षपदाचा तिढा सुटणार आहे. काँग्रेसमध्ये एकाच पदावर कुणी कायमचं राहू शकत नाही, नव्या लोकांना संधी मिळते, असेही ते यावेळी बोलताना म्हणाले.
दिल्लीमधील काँग्रेसच्या पराभवानंतर पक्षांतर्गत मोठा बदल केला जाणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर बोलताना नाना पटोले म्हणाले की, काँग्रेसमध्ये बदली ही एक सिस्टीम आहे. कायमस्वरूपी एकाच पदावर संघटनेत कोणीच व्यक्ती राहत नाही. प्रत्येकाला संधी मिळावी. त्यापेक्षा चांगला काम करणाऱ्यास संधी मिळावी ही अपेक्षा असते. दिल्ली निवडणुकीचा निकाल आणि संघटना याचा काही संबंध नाही.
दरम्यान, नाना पटोले यांच्या यांच्या नेतृत्वाखाली पक्षाला राज्यात लोकसभेत मोठे यश मिळाले होते. काँग्रेसचा राज्यात सर्वाधिक 13 जागांवर विजय झाला होता. मात्र, त्यानंतर काही महिन्यातच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा मोठा पराभव झाला. आता प्रदेशाध्यक्षपदासाठी पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, सतेज पाटील, अमित देशमुख यांच्यासह अनेक नेत्यांची नावे चर्चेत आहेत.