माण गावात सरपंच-उपसरपंच पदाचा नवा राजकीय ‘मुळशी पॅटर्न’

हिंजवडी – संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या आयटी नगरी माण गावात एक वेगळा राजकीय मुळशी पॅटर्न पाहायला मिळाला. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीत माणच्या सरपंचपदी अर्चना सचिन आढाव तर उपसरपंचपदी “जॉइंट किलर’ ठरलेले प्रदीप श्रीरंग पारखी यांची बहुमताने निवड झाली.

माण गावच्या सरपंच पदासाठी प्रबळ दावेदार समजल्या जाणारे नंदकुमार भोईर यांच्या सौभाग्यवतींना धक्कादायक पराभवाचा सामना करावा लागला. मुळशीचे सभापती पांडुरंग ओझरकर याच्या नेतृत्वाखाली माणमध्ये राष्ट्रवादीचे बहुमताने पॅनल विजयी झाले होते. त्यानुसार राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस नंदकुमार भोईर यांच्या सौभाग्यवती सुवर्णा भोईर या सरपंच पदाच्या दावेदार समजल्या जात होत्या.

त्यानुसार निवडीची जेवणावळी सह सर्व जय्यत तयारी करण्यात आली होती. ढोल-ताशे गुलाल उधळण्यास कार्यकर्ते उत्सुक होते. मात्र ऐनवेळेला बाजी पलटली आणि भोईर यांना अर्चना आढाव यांच्याकडून तब्बल 12/2 मतांनी धोबीपछाड स्वीकारावी लागली.

माणचे सरपंच पद हे नागरिकांच्या मागास प्रवर्गातील महिलेसाठी राखीव होते. सरपंच पदासाठी सुवर्णा भोईर, अर्चना आढाव व रुपाली बोडके यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. या वेळी 17 पैकी एक जण गैरहजर राहिल्याने 16 जणांनी गुप्त मतदान केले. यामध्ये अर्चना आढाव यांना 12 मते, सुवर्णा भोईर यांना 2 तर रुपाली बोडके यांना 2 मते पडली.

निवडीनंतर नवनिर्वाचितांना शुभेच्छा देण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक पांडुरंग राक्षे, बापूसाहेब पारखी, नवनाथ पारखी, नाना कोळी, अमृता हिंगडे, बाळासाहेब ओझरकर, किसन ठाकर, पैलवान संदीप पारखी, दत्तात्रय पारखी, बजरंग ओझरकर, राजेंद्र भोसले, बाप्पू भोसले, कांताराम आढाव, सागर पारखी आदी मान्यवर उपस्थित होते.

माणमधील अनपेक्षित निवडीची चर्चा वाऱ्यासारखी तालुक्‍यात पसरली. त्यामुळे माणमध्ये कसं, सभापती म्हणतील तसं आशा घोषणाबाजी ओझरकर समर्थकांकडून देण्यात आल्या. निवडीनंतर विजयी उमेदवारांना वाजत गाजत बाजार पेठेतून मिरवणूक काढण्यात आली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.