नवी दिल्ली : देशात मागील काही दिवसांपासून करोनाचा विस्फोट झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यासोबतच ओमायक्रॉनचा संसर्ग होणाऱ्यांचीही संख्या वाढतच जात आहे. या सर्वावर सध्या एकाच गोष्टीतून नियंत्रण मिळू शकते ते म्हणजे लसीकरण. दरम्यान, लसीकरणात येणा-या तांत्रिक अडचणी सोडवण्यासाठी आरोग्य मंत्रालय पुढे सरसावले आहे. त्यासाठी एक नवीन योजना आखण्यात येत आली आहे.
दुर्गम भागापासून ते द-या खो-यात राहणा-यांना लस द्यावी यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ही नवी योजना अमलात आणण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. या योजनेनुसार आता एकाच मोबाईल क्रमांकावरुन 6 सदस्यांना को-विन पोर्टलवर नोंदणीची आरोग्य मंत्रालयाकडून परवानगी दिली आहे. यापूर्वी ही मर्यादा 4 सदस्यांपुरती मर्यादीत होती. मात्र ग्रामीण भागातील मोठ्या कुटुंबात केवळ एकाच मोबाईलचा वापर होतो. 4 सदस्यांची पूर्वीची मर्यादा अशा कुटुंबांसाठी अडचणी ठरत होती. सरकारने याविषयीचा बदल केला आहे.
लाभार्थ्यांना अधिकाधिक लाभ मिळावा यासाठी को-विन पोर्टलवरच्या सेवा अद्ययावत करण्यात येत आहे. तांत्रिक अडचणी दूर करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. एकाच मोबाईल क्रमांकावरुन 6 सदस्यांची नोंदणी सुलभ करण्यासाठी को-विन पोर्टल अद्ययावत करण्यात आले आहे. यापूर्वी एका मोबाईल क्रमांकावरुन 4 सदस्यांची नोंदणी करता येत होती. त्यात आता आणखी दोन सदस्यांची अधिकची नोंदणी करता येणार आहे. एकूण 6 सदस्यांची नोंदणी करता येणार आहे.
सदस्याला कि-विनने आणखी काही सुविधा सुलभ केल्या आहेत. त्यानुसार, तुम्ही लसीचा एक डोस घेतला असेल अथवा दोन डोस घेतले असेल तर त्याविषयीची सद्यस्थिती सदस्य बदलू शकतो. त्यासंबंधीची योग्य माहिती मात्र त्याला द्यावी लागेल. मोबाईल क्रमांकाआधारे सत्यापन करुन ती माहिती अद्ययावत होईल.
मध्यंतरी को-विन पोर्टलवर अनेक तांत्रिक गडबडी झाल्या आहेत. त्यामुळे तुमची लस घेतल्याची तारीख, नाव, पत्ता आणि इतर माहितीत बदल झाला असेल तर त्या सदस्याला मोबाईल क्रमांक सत्यापन करुन बदलविता येईल. त्याची मुभा आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. त्यासाठी रेज अ इश्यू युटिलीटी या पर्यायचा वापर करता येईल. याठिकाणी संबंधित बदल सूचीत करुन 3 ते 7 दिवसांत लाभार्थ्याची माहिती अद्ययावत करता येते.