नवी दिल्ली – देशाची राजधानी दिल्लीत नवे संसद भवन उभे राहण्याची शक्यता आहे. मोदी सरकारच्या पातळीवर त्याबाबत विचार सुरू आहे. सध्याच्या संसद भवनाचा विस्तार आणि आधुनिकीकरण या पर्यायाचीही चाचपणी सुरू आहे.
लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी शनिवारी संबंधित माहिती पत्रकार परिषदेत दिली. संसदेच्या नव्या इमारतीची आवश्यकता विविध स्तरांतून अधोरेखित केली जात आहे. खासदारांसह विविध घटकांचे मत आजमावण्यासाठी विविध समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. आताच्या इमारतीचेही आधुनिकीकरण केले जाऊ शकते. अर्थात, अंतिम निर्णय अजून व्हायचा आहे, असे त्यांनी नमूद केले.
स्वत: बिर्ला यांनी नुकत्याच समाप्त झालेल्या संसद अधिवेशनादरम्यान लोकसभेत संसद भवनाचा विषय मांडला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या नवभारताच्या संकल्पात संसदेचा विस्तार आणि आधुनिकीकरणाची बाबही समाविष्ट करावी, असे आवाहन त्यांनी केले होते.
भारत म्हणजे जगातील सर्वांत मोठी लोकशाही आहे. त्यामुळे आपले संसद भवन भव्य आणि आकर्षक असावे अशी सर्वांचीच इच्छा असल्याची भावनाही बिर्ला यांनी त्यावेळी व्यक्त केली होती.