न्यूझीलंडला पुन्हा सुपर ओव्हर भोवली

ऑकलंड: विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेतील अंतिम सामन्यात जे घडले त्याचीच पुनरावृत्ती रविवारी पुन्हा एकदा घडली. इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील सामन्यात पुन्हा एकदा सामना सुपर ओव्हरलर निकाली झाला. या विजयासह इंग्लंडने पाच टी-20 सामन्यांची मालिका 3-2 अशी जिंकली.

न्यूझीलंडला पुन्हा एकदा सुपर ओव्हर भोवली. पावसाच्या व्यत्ययामुळे सामना केवळ 11 षटकांचा खेळविण्यात आला. न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना 5 बाद 146 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखाल इंग्लंडच्याही सात बाद 146 धावाच झाल्या. सामना बरोबरीत सुटल्याने पंचांनी सुपर ओव्हर घेण्याचा निर्णय घेतला.

सुपर ओव्हरमध्ये प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडकडून जॉनी बेअरस्टो आणि कर्णधार इयॉन मॉर्गनने 17 धावा नोंदविल्या. न्यूझीलंडचा कर्णधार टीम सौदीने गोलंदाजी केली. तर न्यूझीलंडकडून मार्टिन गप्टिल, टीम सेफर्ट आणि कॉलिन डी ग्रॅंडहोम यांना केवळ 8 धावाच करता आल्या. त्यामुळे इंग्लंडने सुपरओव्हरमध्ये गेलेला हा सामना 9 धावांनी जिंकला व मालिकाही खिशात टाकली.

इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वकरंडक स्पर्धेतही हीच स्थिती झाली होती. अंतिम सामन्यात 50 षटकांनंतर दोन्ही संघांची धावसंख्या बरोबरीत सुटली. यानंतर सुपर ओव्हरमध्येही दोन्ही संघांनी सारख्याच धावा काढल्या. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या अनाकलनीय नियमांचा फटका त्यावेळी न्यूझीलंडला बसला होता. जास्त चौकार व षटकार मारणाऱ्या इंग्लंडला विजयी घोषित करण्यात आले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.