सातारा – राज्य सरकारने लॉकडाऊन काळाता 30 जूनपर्यंत दिलेल्या सूचनांनुसार सातारा जिल्ह्यातील प्रतिंबधित व सुरू राहणाऱ्या बाबींबाबत जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी सोमवारी आदेश जारी केले.
राज्यातील करोनाच्या अनुषंगाने सुधारित सूचनांनुसार पुन्हा जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश पारित केलेला आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी क्रिमिनल प्रोसिजर कोड 1973 चे कलम 144 मधील तरतुदीनुसार सातारा जिल्ह्यात दि. 30 जूनच्या रात्री 12 वाजेपर्यंत खालीलप्रमाणे आदेश दिले आहेत.
करोना रुग्ण सापडतो त्या ठिकाणी कंटेनमेंट झोन जाहीर करण्याचे अधिकार प्रांताधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. अशा झोनबाबत प्रांताधिकारी वेगळा आदेश काढून त्या झोनमध्ये कोणत्या बाबी सुरू राहतील व कोणत्या बाबी प्रतिबंधित राहतील, याबाबत सूचित करतील. कंटेनमेंट झोन वगळता सातारा जिल्ह्यातील नवीन आदेश इतर क्षेत्रासाठी लागू राहील. त्यानुसार वैद्यकीय व्यवसायिक, परिचारिका, पॅरा वैद्यकीय कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी आणि रुग्णवाहिका यांना कोणतेही प्रतिबंधाशिवाय राज्यांतर्गत व राज्याबाहेर प्रवास करण्यास मान्यता प्राधिकाऱ्यांनी द्यावी, आंतरराज्य व आंतरजिल्हा व्यक्तीच्या वाहतुकीस निर्बंध राहतील, सर्व प्रकारच्या वस्तुंच्या आंतरराज्य वाहतुकीस मान्यता द्यावी, यामध्ये रिकाम्या वाहनांचा देखील समावेश असेल.
जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी आरोग्य सेतू ऍपचा वापर करणे बंधनकारक राहील. तसेच ऍपवरील माहिती प्रत्येकाने वेळोवेळी अद्ययावत करणे बंधनकारक राहील. सार्वजनिक ठिकाणी, घराबाहेर व घरामध्ये लोकांचा वावर आहे, तेथे चेहऱ्याचे तोंडावर व नाकावर मास्कचा वापर न करणाऱ्या व्यक्तींवर 500 रुपये दंड आकारण्यात येईल. सार्वजनिक अथवा खासगी जागेत थुंकण्यास मनाई असून थुंकल्यास 1000 रुपये दंड आकारण्यात येईल. कोणत्याही कारणासाठी मोठ्या संख्येने लोकांनी एकत्र येण्यावर प्रतिबंध राहील. लग्न समारंभास 50 पर्यत व्यक्तींना सामाजिक अंतर ठेवून कार्यक्रम करण्यास परवानगी राहील. तथापि लोकांची गर्दी होऊ नये म्हणून संयोजकांनी काळजी घेणे गरजेचे राहील.
अंत्यविधीसारख्या कार्यक्रमास 20 पर्यंत व्यक्तींना सामाजिक अंतर ठेवून कार्यक्रम करण्यास परवानगी राहील. सार्वजनिक ठिकाणी दारु, पान, तंबाखू इत्यादी सेवन करण्यास मनाई करण्यात येत आहे. दुकाने व आस्तापनांसाठी यापूर्वी असणारे नियम पुढेही सुरू राहतील. आदेशाची अंमबजावणी करण्यास संबंधितांनी टाळाटाळ केल्यास अथवा विरोध दर्शविल्यास संबंधितांविरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 चे कलम 51, भारतीय साथरोग अधिनियम 1897 व भारतीय दंड संहिता कलम 188 नुसार दंडनीय, कायदेशीर कारवाई संबंधित पालिस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी करावी, असे आदेशात नमूद केले आहे.
हे सुरू राहणार
-इतर सर्व दुकाने, शॉप, औद्योगिक व खासगी आस्थापना सुरू ठेवण्यास परवानगी.
-क्रीडांगण, स्टेडियम व इतर सार्वजनिक खुल्या जागेमध्ये प्रेक्षकांच्या उपस्थितीशिवाय व -समूहविरहीत, सामाजिक अंतर ठेवून शाररिक व्यायाम व इतर क्रिया करण्यास परवानगी.
-ंसर्व वैयक्तिक व सार्वजनिक वाहतुकीस पुढीलप्रमाणे परवानगी राहील – दुचाकी वाहनांवर एक चालक, -तीन चाकी व चार चाकी वाहनांत 1 + 2 व्यक्ती.
-सुरक्षित अंतर व सफाई व्यवस्थेची खबरदारी घेऊन प्रवासी क्षमतेच्या 50 टक्के क्षमतेने जिल्ह्यांतर्गत बस सेवा सुरु करण्यास परवानगी.
-सर्व मार्केट, दुकाने सकाळी 9 ते सांयकाळी 5 या वेळेमध्ये सुरू राहतील. गर्दी अथवा सामाजिक अंतराचे पालन न केल्यास तात्काळ बंद.
हे राहणार बंद
-अत्यावश्यक सेवा व वैद्यकीय सेवा या कारणाशिवाय सर्व व्यक्तींच्या हालचाली रात्री 9 ते सकाळी 5 या कालावधीत प्रतिबंधित.
-65 वर्षावरील व्यक्ती, व्याधीयुक्त व्यक्ती, गर्भवती महिला, 10 वर्षाखालील मुले यांनी अत्यावश्यक -सेवा व वैद्यकीय सेवा वगळता घरामध्येच राहावे. त्यांना बाहेर पडण्यास प्रतिबंध.
-सर्व शाळा कॉलेज, शैक्षणिक संस्था, प्रशिक्षण संस्था, कोचिंग इन्स्टिट्यूट या बंद राहतील.
-चित्रपटगृहे, जिम, व्यायामशाळा, सर्व मॉल व बाजारपेठ संकुल, स्विमींग पुल, एंटरटेनमेंट पार्क, -थिएटर, बार्स ड ऑडिटोरियम, असेंम्बली हॉल, मंगल कार्यालय यासारख्या इतर सर्व जागा बंद.
-रेल्वे व विमान प्रवासी वाहतूक काही ठराविक आदेशाने मान्यता दिली असल्यास सुरू राहील.
-सर्व सामाजिक, राजकीय, क्रीडा, मनोरंजन, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम व इतर मेळावे व -मोठया संख्येने लोक जमा होणारे कार्यक्रम, परिषदा बंद.
-सर्व धार्मिक स्थळे व प्रार्थनास्थळे सर्वसामान्यांसाठी बंद.
-केशकर्तनालय, स्पा, सलून, ब्युटी पार्लर बंद.
-शॉपिंग मॉल, हॉटेल, रेस्टॉरंट आणि हॉस्पिटॅलिटी सर्व्हिसेस बंद.