वंचित बहुजन आघाडीच्यानिमित्ताने नवीन पर्याय

विधानसभेला चार मतदारसंघात राहणार झंझावात : इच्छुक उमेदवारांची आतापासून तयारी

ते कार्यकर्ते मनाने आघाडीसोबत

वंचित बहुजन आघाडीच्या लोकसभा निवडणुकीतील झंझावातानंतर सर्वांचीच झोप उडवली आहे. सातारा जिल्ह्यातील विविध पक्ष व संघटनांमधील कार्यकर्त्यांची मने आघाडीच्या दिशेने वळली असल्याचे निवडणुकीच्या निमित्ताने दिसून आले. त्यामुळे साहजिकच नेते देखील सैरभर झालेत. लोकसभा निवडणुकीत आघाडीला भरीव यश प्राप्त झाले तर मनाने वळालेले कार्यकर्ते तत्काळ आघाडीत प्रवेश करताना दिसून येतील. तेव्हा, कार्यकर्त्यांचे डॅमेज कंट्रोल रोखण्याचे आव्हान नेत्यांसमोर असणार आहे. ते कंट्रोल करताना लोकसभा निवडणुकीतील कार्याचा हिशेब त्यांना कार्यकर्त्यांना द्यावा लागणार आहे.

सम्राट गायकवाड

सातारा – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर तिसरा पर्याय म्हणून आकाराला आलेल्या वंचित बहुजन आघाडीचा प्रभाव खऱ्या अर्थाने आगामी विधानसभा निवडणुकीत दिसणार आहे. विशेषत: सातारा जिल्ह्यातील माण-खटाव, फलटण, कराड-दक्षिण अन्‌ वाई विधानसभा मतदारसंघात आघाडीचा झंझावात पाहण्यास मिळणास मिळणार आहे. दरम्यान, चार ही विधानसभा मतदारसंघात आघाडीच्यावतीने इच्छुकांनी आतापासूनच संघटनात्मक व राजकीय बांधणी करण्यास सुरुवात केल्यामुळे प्रस्थापित लोकप्रतिधींच्या समोर नवे आव्हान निर्माण झाले आहे.

पक्ष कोणताही असो. सत्ता मात्र, ठरावीक घराण्यांमध्येच राहिली. नेमका हा मुद्दा उपस्थित करत, सत्तेपासून दूर राहिलेल्या सर्वच जातींमधील घटकांची मोट बांधत ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीची स्थापना केली. पुढे एमआयएमचे खासदार असाऊद्दीन ओवेसी यांनी ऍड. प्रकाश आंबेडकरांची साथ दिली. त्यानंतर राज्यातील राजकीय चित्र पूर्णपणे पालटून गेले. कारण, आघाडीची स्थापना होण्यापूर्वी मतदारांसमोर कॉंग्रेस-राष्ट्रवादी अथवा भाजप-सेना यापैकी एक पर्याय निवडण्याची संधी होती. परंतु वंचित बहुजन आघाडीच्या निमित्ताने मतदारांना नवा पर्याय मिळाला.

लोकसभा निवडणुकीत आघाडीने राज्यातील 48 जागांवर सर्व जातीतील उमेदवारांना संधी दिली. एवढेच नव्हे तर, ऍड. आंबेडकर अकोल्यासह सोलापूरमधून, आ. इम्त्यिाज जलील औरंगाबाद, गोपीचंद पडळकर सांगलीतून लढले. याठिकाणी झालेल्या सर्वच सभांमुळे आणि विशेषत: मुंबईतील विराट सभेने राज्यातील जनतेचे लक्ष वेधले गेले. राज्याच्या कानाकोपऱ्यात वंचित बहुजन आघाडी अल्पावधीत पोहचली. परिणामी वंचित घटकांमधील युवकांना आघाडीबद्दल आकर्षण अधिक वाढू लागले. सातारा जिल्ह्यातदेखील त्याचा परिणाम जाणवून आला. सातारा लोकसभा मतदारसंघात सहदेव ऐवळे तर माढा मतदारसंघात ऍड. विजय मोरे यांना उमेदवारी देण्यात आली. दोन्ही उमेदवार मतदारांच्या परिचयाचे नव्हते. मात्र, ज्याप्रमाणे भाजपमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, कॉंग्रेसमध्ये राहुल गांधी, राष्ट्रवादीमध्ये शरद पवार अन शिवसेनेमध्ये स्व. बाळासाहेब ठाकरे व उद्धव ठाकरे यांनाच उमेदवार मानून मतदान होते.

त्याप्रमाणे ऍड. प्रकाश आंबेडकर व खा. असाऊद्दीन ओवेसी यांनाच उमेदवार मानून सातारा व माढा मतदारसंघात चांगल्या प्रमाणात मतदान झाले आहे. त्याचबरोबर विशेषत: माढा मतदारसंघात प्राबल्य असलेल्या धनगर समाजाची आरक्षणाच्या प्रश्‍नाची कॉंग्रेस-राष्ट्रवादी व भाजप-सेना दोघांकडून सोडवणूक झाली नाही. त्याचबरोबर धनगर समाजाचे युवा नेतृत्व गोपींचंद पडळकर यांना सांगलीत आघाडीची उमेदवारी देण्यात आली. त्याचा परिणाम शेजारील माढा, बारामती मतदारसंघात जाणवून आला.

मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर आघाडीला किती जागा मिळतील, याबाबत तर्क वितर्क लावले जात आहेत. त्याची स्पष्टता 23 मे रोजी निकालाच्या दिवशी होणार आहे. मात्र, आघाडीला मिळणाऱ्या जागांपेक्षा राज्यात एकूण प्राप्त होणाऱ्या मतांची संख्या आगामी विधानसभा निवडणुकीत परिणामकारक ठरणार आहे. निवडणूक आयोगाच्या निकषानुसार आघाडीला मते मिळाली तर आघाडीला अधिकृत निवडणूक चिन्ह प्राप्त होणार आहे. नेमकी ही बाब राज्याच्या राजकारणाला कलाटणी देणारी ठरणार आहे. लोकसभेचे निकाल एनडीए अथवा युपीएच्या बाजूने लागले तरी आघाडीची विधानसभा निवडणुकीत स्वतंत्र लढण्याची तयारी असणार आहे, असे अत्तापर्यंतच्या व्यूहरचनेनुसार दिसून आले आहे. वंचित बहुजन आघाडीचे राज्यातील सर्व 288 जागांवर उमेदवार उभे असतील.

सातारा जिल्ह्याचा विचार केला तर आघाडीच्या वैचारिक अजेंड्यानुसार चार विधानसभा मतदारसंघात पोषक वातावरण आहे. माण-खटाव, फलटण आणि वाई मतदारसंघात धनगर समाजाचे प्राबल्य आहे. त्याचबरोबर तिन्ही मतदारसंघात सोबतीला मुस्लिम, ओबीसी व एस.सी.प्रवर्गातील मतदारांची संख्या लक्षणीय आहे. कराड-दक्षिण मतदारसंघात मुस्लिम समाजाची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे आघाडी चार ही मतदारसंघात पूर्ण ताकद लावणार हे निश्‍चित आहे. पार्श्‍वभूमीवर चार मतदारसंघात इच्छूक उमेदवारांची संख्या वाढत आहे. बहुतांश इच्छुक उमेदवारांनी लोकसभा निवडणुकीच्या निकालाची चिंता न बाळगता आत्मविश्‍वासाने तयारीला सुरुवात केली आहे.

त्यामुळे आगामी निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचा झंझावात पाहण्यास मिळणार आहे. परिणामी वंचित बहुजन आघाडीचा धसका विशेषत: कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आतापासून घेतला आहे. जिल्ह्यातील आठ पैकी सात विधानसभा मतदारसंघात कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे आमदार आहेत. सात ही मतदारसंघातील धनगर, ओबीसी, मुस्लिम, एससी प्रवर्गातील मतदार कायम कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या बाजूने उभा राहिले होते. मात्र, आता सर्व प्रवर्गाची मोट बांधून ऍड. आंबेडकरांनी मतदारांपुढे नवा पर्याय उभा केला आहे. अशावेळी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी, कॉंग्रेस-राष्ट्रवादी, भाजप-सेना अशी तिरंगी लढत होणार आहे. तेव्हा विशेषत: कॉंग्रेस-राष्ट्रवादी वंचित बहुजन आघाडीच्या आव्हानाचा सामना करण्यात यशस्वी ठरणार? की, वंचित बहुजन आघाडी कॉंग्रेस-राष्ट्रवादीची मक्तेदारी मोडीत काढून जिल्ह्यात इतिहास घडविणार? हे यंदाच्या विधानसभा निवडणुकीचे वैशिष्ट्य असणार आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.