नवी मुंबई – सानपाडा परिसरात बालरोगतज्ज्ञ डाॅक्टरने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. डॉ. प्रेम पहूजा असे आत्महत्या केलेल्या डाॅक्टरचे नाव आहे. ही घटना बुधवारी घडली.
पहूजा यांचे सानपाडा परिसरात रुग्णालय आहे. त्यांच्या पत्नी कल्याण येथे राहत असल्याने डॉक्टर सानपाड्यात एकटेच राहत होते. डॉक्टर संध्याकाळी 7 वाजता ओपीडीला आले नसल्याने रुग्णालयातून त्यांना फोन केल्यावर त्यांचा फोन बंद येत होता. त्यामुळे रुग्णालयातील एका कर्मचाऱ्याने वॉचमेनसोबत घरी जाऊन त्यांच्या घराचा दरवाजा वाजवला. पण आतून कोणताच प्रतिसाद आला नाही.
याबाबत रुग्णालय कर्मचाऱ्यांनी सोसायटीच्या सदस्यांनाही कल्पना दिली. त्यानंतर सोसायटी सदस्यांनी पोलिसांना कळवून दरवाजा तोडला. यावेळी डॉक्टर गॅलरीमधील पत्र्याच्या अँगेलला ओढणीच्या साहाय्याने गळफास घेऊन लटकलेल्या अवस्थेत दिसले.
डॉक्टर प्रेम पहूजा हसतमुख आणि दिलदार व्यक्तिमत्व असलेले नवी मुंबई परिसरात प्रचलित डॉक्टर होते. घटनास्थळी कोणत्याही प्रकारची सुसाईड नोट सापडेली नाही. त्यामुळे मृत्यूचे गुढ वाढले आहे. प्राथमिक माहितीनुसार त्यांनी मानसिक तणावातून आत्महत्या केल्याचे सांगण्यात येत आहे. सानपाडा पोलिसांनी त्यांचा मृतदेह त्याब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पालिका रुग्णालयात पाठवला. पुढील तपास पोलिस करत आहेत.