‘कमवा व शिका’साठी नवीन कार्यपद्धत

चौकशी समितीने विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेकडे सादर केल्या शिफारशी

पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या “कमवा व शिका’ योजनेतील आर्थिक गैरव्यवहारांसह चुकीच्या कामकाजाला कायमस्वरूपी चाप बसविण्यात येणार आहे. या योजनेसाठी आता नवीन कार्यपद्धती राबविण्यात येणार आहे. त्याबाबतच्या शिफारशी चौकशी समितीने विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेकडे सादर केल्या आहेत.

विद्यापीठातील “कमवा व शिका’ ही महत्त्वाची योजना आहे. या योजनेत आर्थिक गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्याकडे करण्यात आल्या होत्या. त्यानुसार कुलगुरू डॉ. करमळकर यांनी या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी माजी कुलगुरू डॉ. अरुण अडसूळ यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती. या समितीने सादर केलेल्या चौकशी अहवालानुसार दोषींवर कारवाई करण्यात आली आहे. या चौकशी समितीवर “कमवा व शिका’ योजनेचा अभ्यास करून नवीन कार्यपद्धती बाबतचा आराखडा सादर करण्याची जबाबदारीही सोपविण्यात आली होती. समितीचे अध्यक्ष डॉ. अडसूळ यांच्यासह व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. संजय चाकणे, अधिसभा सदस्य बागेश्री मंठाळकर, माजी मराठी विभागप्रमुख डॉ. मनोहर जाधव, विधी विभागप्रमुख डॉ. दुर्गाम्बीनी पटेल आदींचा समितीत समावेश करण्यात आला होता. या समितीने “कमवा व शिका’ या योजनेचा सखोल अभ्यास करून शिफारशी तयार केल्या आहेत.

यावर समितीच्या नुकत्याच झालेल्या महत्त्वाच्या बैठकीत सविस्तर चर्चा झाली. त्यानंतर शिफारशी विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेकडे सुपूर्द करण्यात आल्या आहेत. आता या परिषदेच्या बैठकीत अंतिम निर्णय झाल्यानंतर तत्काळ नवीन कार्यपद्धतीची अंमलबजावणी करण्यात येणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

विद्यार्थ्यांना मिळणार न्याय
योजनेच्या नवीन कार्यपद्धतीने प्रामाणिकपणे कामकाज करणाऱ्या विद्यार्थ्यांना न्याय मिळणार आहे. नकारात्मक प्रकारांना आळा बसणार आहे. आर्थिक गैरव्यवहार करण्याला कोणताही वाव राहणार नाही, असेही विद्यापीठाच्या विश्‍वसनीय सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.

नवीन शिफारशी
पहिल्या वर्षी अनुत्तीर्ण झाल्यास योजनेचा लाभ मिळणार नाही
जेवढे काम तेवढाच मोबदला
वर्गात 75 टक्‍के उपस्थिती अनिवार्य
विभागप्रमुखांचे शिफारस पत्र सादर करणे बंधनकारक
विद्यार्थ्यांचे थम्ब इम्प्रेशन होणार

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)