कसोटी क्रिकेटमध्ये दिसणार नवी जर्सी

इंग्लंड-ऑस्ट्रेलिया ऍशेस कसोटी मालिकेपासून बदल

दुबई – क्रिकेटमध्ये टी-20 आणि एकदिवसीय हे प्रकार आल्यानंतर कसोटी क्रिकेटकडे प्रेक्षकांचे दुर्लक्ष होताना दिसून येते आहे. ज्यामुळे कसोटी क्रिकेटला मिळणारा प्रेक्षक वर्ग दिवसेंदिवस खालावत चालला आहे. त्यामुळे कसोटी क्रिकेट मधील रोमांच आणखीन वाढावा यासाठी आयसीसी सातत्याने प्रयत्न करताना दिसून येत आहे. आता लवकरच होत असलेल्या इंग्लंड-ऑस्ट्रेलिया ऍशेस कसोटी मालिकेत कसोटी खेळणाऱ्या खेळाडूंच्या जर्सीवर त्यांचे नाव दिसणार आहे. जर्सीचा रंग पांढराच राहील पण त्यावर दुसऱ्या रंगाने त्या खेळाडूचा नंबर आणि नाव लिहिलेले पहायला मिळणार आहे. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच हा प्रयोग होत आहे.

कसोटी क्रिकेटहे संथ गतीने चालते त्यामुळे त्याला अनेक प्रेक्षक बोरिंग समजतात. त्यामुळे मैदानावर रंग भरण्यासाठी खेळाडूंच्या जर्सीवर त्यांचे नाव आणि नंबर देण्याच्या प्रस्तावाला आंतरराष्ट्रीय क्रिकेट कौन्सिलने (आयसीसी) मंजुरी दिली आहे. त्यातच, भारताची टीम आता वेस्ट इंडिज दौऱ्यावर जात आहे. या दौऱ्यात दोन्ही संघांचे खेळाडूही नवी जर्सी घालतील.

भविष्यात जर्सीही रंगीत होणार?

येत्या 1 ऑगस्टपासून इंग्लंडमध्ये ऍशेस सीरिज सुरू होत आहे. या दोन पारंपरिक प्रतिस्पर्धांमध्ये मैदानावर होणारी लढाई पहायला क्रिकेटप्रेमींना आवडते. क्रिकेटमध्ये रंगीत जर्सी पहिल्यांदा 1992च्या वर्ल्ड कपमध्ये वापरण्यात आली. त्यानंतर क्रिकेटने रंगीत जर्सीला आपले केले. टेस्ट क्रिकेटमध्ये आणखी रंजकता आणण्यासाठी जर्सी रंगीत करण्याचा प्रस्तावही होता. पण, त्यावर अद्याप गांभीर्याने विचार झालेला नाही. आता नाव आणि नंबरच्या माध्यमातून आयसीसीने बदल स्वीकारायला सुरुवात केली आहे. भविष्यात कसोटी क्रिकेटमध्ये खेळाडू रंगीत जर्सीसह मैदानावर उतरतील, अशी अपेक्षा आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.