सिडनी – भारत आणि ऑस्ट्रेलिया मालिकेची सुरुवात येत्या शुक्रवारपासून (दि. 27) एकदिवसीय सामन्याने होणार आहे. या दौऱ्यात 3 एकदिवसीय, 3 टी-20 आणि 4 कसोटी सामन्यांची मालिका खेळण्यात येणार आहे. यापूर्वीच भारतीय संघाला नवीन जर्सी मिळाली आहे. या नवीन जर्सीच फोटो सलामीवीर फलंदाज शिखर धवनने शेअर केला आहे.
धवनने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून फोटो शेअर करत म्हटले की, नवीन जर्सी, नवी प्रेरणा, आम्ही तयार आहोत.
New jersey, renewed motivation. Ready to go. 🇮🇳 pic.twitter.com/gKG9gS78th
— Shikhar Dhawan (@SDhawan25) November 24, 2020
भारतीय संघ ऑस्ट्रेलिया विरुद्ध वनडे आणि टी20 मालिकेसाठी 80 च्या दशकातून प्रेरित असलेली “रेट्रो’ थीम जर्सी घालणार आहे. या नव्या जर्सीचा रंग गडद निळा (नेव्ही ब्ल्यू) आहे. तसेच या जर्सीवर एमपीएल स्पोर्टसचे नावही आहे. 1992 च्या विश्वचषकातही भारतीय संघाने अशाप्रकारची जर्सी घातली होती.
विशेष म्हणजे नुकतेच बीसीसीआयने एमपीएलला नवे किट स्पॉन्सर्स म्हणून घोषित केले होते. एमपीएलबरोबर बीसीसीआयने 120 कोटी रुपयांचा अधिक महसूल वाटा असा तीन वर्षांचा करार केला आहे. त्यामुळे आता नाईकीची जागा एमपीएल घेणार आहे.