नवा भारत मातृशक्तीचा असेल : राज्यपाल कोश्‍यारी

मुंबई,  : प्रत्येक क्षेत्रात महिला आपला ठसा उमटवत आहेत. कुलपती या नात्याने आपण उपस्थित असलेल्या प्रत्येक दीक्षांत समारोहात 5 सुवर्णपदके मुले तर 50 सुवर्णपदके मुली पटकावतात. त्यामुळे नवा भारत मातृशक्तीचा असेल, भगिनीशक्तीचा असेल, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्‍यारी यांनी केले. श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाचा 70वा वार्षिक दीक्षांत समारंभ राज्यपाल तथा कुलपती भगत सिंह कोश्‍यारी यांच्या दूरस्थ उपस्थितीत आज झाला.

“एसएनडीटी’ विद्यापीठाचे संस्थापक महर्षी कर्वे यांच्या स्मृतींना राज्यपालांनी अभिवादन केले. शिक्षण केवळ अर्थार्जनासाठी न राहता ते मूल्यांवर आधारित असावे. स्नातकांनी आपल्या डोळ्यांपुढे उच्च ध्येय ठेवून तसेच नीतीमूल्ये, सदाचार, त्याग व सेवाभाव अंगीकार करून वाटचाल केल्यास त्यांच्या वैयक्तिक उत्कर्षासह राष्ट्र उत्कर्ष साधला जाईल. असेही राज्यपाल म्हणाले.

दीक्षांत समारोहात स्नातकांना उद्देशून मातृ देवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, राष्ट्रदेवो भव हा उपदेश दिला जातो याचे स्मरण देऊन कोश्‍यारी म्हणाले की, या उपदेशामध्ये मातृशक्तीला अग्रमान दिलेला आहे. आपल्या देशात कुमारी पूजा केली जाते. बंगालमध्ये तर सुनेला देखील बहुमाता म्हटले जाते, ही भारताची परंपरा आहे. प्रत्येक मुलगी ही लक्ष्मी, सरस्वती व दुर्गेचे रूप असून मुलींमध्ये सेवाभाव, वात्सल्य, त्याग व समर्पण भाव निसर्गदत्त असतो. त्यामुळे प्रत्येकाने मातृशक्तीला जागृत केल्यास आपल्याला सर्व क्षेत्रात सफलता मिळेल व त्यातून समाज व देश प्रगती करेल, असे राज्यपालांनी सांगितले.
दीक्षांत समारोहात विज्ञान व तंत्रज्ञान, वाणिज्य व व्यवस्थापन, मानव्यशास्त्र, आंतरशाखीय अध्ययन या शाखांमधील 16483 विद्यार्थ्यांना पदवी, पदविका व आचार्य पदव्या प्रदान करण्यात आल्या. यावेळी 120 विद्यार्थ्यांना 73 सुवर्ण पदके, एक रौप्य पदक व 218 पारितोषिके प्रदान करण्यात आली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.