यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून प्रवेश घेता येणार
पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विद्यार्थिनींसाठीचे नवीन वसतिगृहाचे काम पूर्ण झाले आहे. या वसतिगृहात विद्यार्थिंनीना यंदाच्या शैक्षणिक वर्षात प्रवेश दिला जाणार आहे. त्यामुळे विद्यापीठ संकुलात प्रवेश घेणाऱ्या सावित्रींच्या लेकी अर्थात विद्यार्थिनींना नवीन वसतिगृहाची सुविधा प्राप्त होणार असल्याचे स्पष्ट होत आहे.
तत्कालीन कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे यांनी 13 फेब्रुवारी 2017 मध्ये विद्यापीठात मुलींसाठीच्या नवीन वसतिगृहाचे भूमिपूजन केले होते. त्यासाठी सुमारे 5 कोटींची तरतूद केली आणि हा सर्व निधी “विद्यापीठ अनुदान आयोगा’कडून प्राप्त झाला होता. मात्र या वसतिगृहाच्या कामास चालढकल केली जात होती. मुलींच्या नवीन वसतिगृहाबाबत विद्यापीठ प्रशासनास अधिसभा सदस्यांनी धारेवर धरले. त्यानंतर वसतिगृहाचे काम हाती घेण्यात आले. सध्या अस्तित्वास असलेल्या विद्यापीठातील मुलींच्या वसतिगृहाच्या पाठीमागे ही पाच मजली इमारत आहे. यात जवळपास 200 मुलींना राहण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे.
मुलींसाठी नव्याने बांधण्यात आलेल्या वसतिगृहाचे काम पूर्ण झाले. यंदाच्या शैक्षणिक वर्षातील प्रवेशासाठी मुलींना या वसतिगृहात प्रवेश दिले जातील. विद्यापीठात नव्याने एका वसतिगृहाची भर पडली असून, विद्यार्थिंनीना निवासाची चांगली सुविधा उपलब्ध होईल.
– डॉ. प्रफुल्ल पवार, कुलसचिव, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ