नवी दिल्ली : केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने होम आयसोलेशनसाठी नवीन मार्गदर्शक नियम जारी केले आहेत. करोनाबाधितांच्या आयसोलेशनचा कालावधी तीन दिवसांनी कमी केला आहे. टेस्ट पॉजिटिव्ह आल्यावर सलग तीन दिवस ताप नसेल तर फक्त सात दिवसाचे होम आयसोलेशन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याआधी 10 दिवसांचे आयसोलेशन अनिवार्य करण्यात आले होते.
होम आयसोलेशनच्या नव्या सूचना तातडीने लागू करण्यासाठी राज्यांना निर्देश देण्यात आले आहेत. नियंत्रण कक्षातून होम आयसोलेशनमध्ये असणाऱ्यांच्या संपर्कात रहावे. होम आयसोलेशनमधील एखाद्या रुग्णाची प्रकृती आणखी बिघडल्यास त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता असल्यास त्याच्यासाठी रुग्णवाहिकेपासून ते रुग्णालयात उपचारासाठी खाटा उपलब्ध करता येऊ शकेल.
देशभरात करोना संसर्गाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ होत असल्याने सरकारची चिंता वाढली आहे. ओमायक्रॉन आणि त्याआधीच्या डेल्टा व्हेरियंटचा फार मोठा फटका दक्षिण आफ्रिकेला बसला नव्हता. तर, भारताला डेल्टा व्हेरियंटचा मोठा फटका बसला होता. त्यामुळे आता ओमायक्रॉन व्हेरियंटबाबतही सरकारकडून खबरदारी बाळगली जात आहे.
करोनाबाधितांची संख्या वाढल्यानंतर रुग्णालयात दाखल होणाऱ्या बाधितांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. भारतात अनेक नागरिकांना इतर गंभीर आजारांनीही ग्रासले आहेत.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वतीन जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, देशात सध्या सक्रिय रुग्णांची संख्या वाढून दोन लाख 14 हजार 4 वर पोहोचली आहे. या महामारीत जीव गमावणाऱ्यांची संख्या वाढून 4 लाख 82 हजार 551 वर पोहोचली आहे. आकडेवारीनुसार, 15 हजार 389 रुग्ण ठिक झाले आहेत. आतापर्यंत 3 कोटी 43 लाख 21 हजार 803 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.