डिसेंबरआधीच नवे सरकार स्थापन होईल – संजय राऊत 

मुंबई – राज्यात सरकार कधी स्थापन होणार असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. यावर खासदार संजय राऊत यांनी उत्तर दिले आहे. डिसेंबर महिना उजाडण्याआधी महाराष्ट्रात नवे सरकार स्थापन झालेले असेल आणि शिवसेनेचाच मुख्यमंत्री पदाची शपथ घेईल, असे त्यांनी सांगितले आहे.

संजय राऊत म्हणाले कि, भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. परंतु, भाजप सरकार स्थापन करण्यास अयशस्वी ठरला आहे. त्यामुळे शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधील सत्तास्थापनेबाबतची चर्चा अंतिम टप्प्यात आली आहे. येत्या पाच-सहा दिवसात सत्तास्थापनेची प्रक्रिया पूर्ण करण्यात येऊन डिसेंबर महिना उजाडण्याआधीच सरकार स्थापन झालेले असेल, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातील होणाऱ्या भेटीबाबत विचारले असता संजय राऊत म्हणाले की, नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान आहेत. त्यांची भेट घेणे गैर आहे का. शरद पवार हे राज्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांसंदर्भात मोदींची भेट घेणार आहेत. अवकाळी पाऊस आणि अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर झालेल्या नुकसानाबाबत या बैठकीत चर्चा होणार आहे, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.

तसेच भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे सरकार स्थापनेसाठी एकत्र येणार असल्याच्या चर्चा ह्या केवळ निव्वळ अफवा आहेत, असेही राऊत म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.