खबऱ्यांच्या रकमेत घशघशीत 20 टक्के होणार वाढ
मुंबई : अवैध मद्य आणि मद्यार्क वाहतुकीला आळा घालण्यासाठी सरकारने नवा फंडा शोधून काढला आहे. त्यासाठी खबऱ्यांचे जाळे मजबूत केले जाणार असून त्यांच्या बक्षिस म्हणून घशघशीत 20 टक्के वाढ करण्यात येणार आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयीन इमारती बांधताना यापुढे “ग्रीन बिल्डींग’ संकल्पनेचा आधार घेण्याच्या सूचना पवार यांनी दिल्या.
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या विविध कार्यालयांच्या बांधकामासंदर्भात मंत्रालयात सादरीकरण करण्यात आले. त्यावेळी उपमुख्यमंत्री बोलत होते. पवार म्हणाले, राज्यातील अवैध मद्य आणि मद्यार्क वाहतूकीमुळे राज्याच्या महसुलाचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे ही अवैध वाहतूक रोखण्यासाठी तपासणी चौक्यांची संख्या वाढवण्यात यावी. नाक्यांवर कडक तपासणी करावी. विषारी ताडीमुळे होणारे मृत्यू रोखण्यासाठी गांर्भीयाने विचार करण्याची गरजही उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.
राज्य उत्पादन शुल्क विभागाची कार्यालये शासकीय जागेत बांधताना ग्रीड बिल्डींग’ संकल्पनेच्या बरोबरीने सौरऊर्जा यंत्रणा, इमारतीची स्वच्छता आदी बाबींना प्राधान्य द्यावे. राज्यातील भाड्याच्या इमारतीत असणाऱ्या कार्यालयांच्या खर्चाचा जिल्हानिहाय आढावा घेण्याच्या सूचनाही त्यांनी वित्त विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्या.