नितीन राऊत
पार, वस्तरा, बलुतेदारी हद्दपार
पूर्वीच्या काळी खेडेगावात नाभिक कारागीर गावच्या पारावर अथवा आपल्या गल्लीतील वाड्यासमोर पोते टाकून बैठक मांडायचे. या कारागिरासमोर गावातील मंडळी रांगेने बसायचे. मशीन, वस्तरा या शस्त्रांनी केस व दाढी केली जायची. तर कारागिरांना मोबदला म्हणून धान्य, पेंड्या स्वरूपात मोबदला दिला जायचा. अनेकवेळा रांगेतील लहान मुलांना डावलून घाई गडबडीत असणाऱ्या प्रतिष्ठित लोकांना दाढीसाठी नंबर दिला जाई. हे दृष्य आता फक्त जुन्या मराठी चित्रपटातच पाहायला मिळते.
वडूज – पूर्वी सलूनच्या खुर्चीवर मुलांना बसवल्यानंतर, एकदम बारीक करा, मिल्ट्री कट मारा, त्यांच्या केसाला लय वाढ आहे, असे ऐकवले जाणारे संवाद आता इतिहास जमा झाले आहेत. आज काल हाय फाय सलूनच्या खुर्चीवर बसून वनसाईड, टू साईड, अन् हाय लाईट जमाई राजा करणाऱ्या तरुणांच्या अन् शालेय मुलांच्या संख्येत ग्रामीण भागातही मोठी वाढ झाली आहे. त्यांचा कल दिवसेंदिवस विविध आकाराच्या कटिंगकडे वाढत चालला आहे. या नवीन फॅशनमुळे जुन्या पारंपरिक पद्धतीने काम करणाऱ्या कारागिरासमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे.
अशा केसांच्या कट्ससाठी ग्रामीण भागात 50 ते 70 रुपये मोजले जातात. आजची स्मार्ट तरुणाई आपल्या केस, दाढी मिशांच्या बाबतीत तेवढीच जागरूक असल्याचे दिसते. चित्रपट मालिकांमधील अभिनेते, गायक, लोकप्रिय खेळाडूंनी केलेल्या हेअर कट्सची कॉपी केली जात आहे. तर विशेष म्हणजे “मुँछ हो तो कमांडर अभिनंदन वर्धमान जैसी’ अशी म्हणही प्रचलित होत असून त्यांच्यासारख्या मिशा आपल्याही असाव्यात म्हणून अनेक तरुण अगदी अभिनंदनसारख्या मिशाना आकार देत आहेत. तर यासाठी आता पारंपरिक दुकानांच्या जागी हेअर स्टुडिओ तयार होत आहेत. सोन्याच्या दुकानांना लाजवेल अशा सलूनच्या दुकानांना फर्निचर तयार केली जात आहेत. अतिशय आखीव रेखीव चकचकीत दुकानांमधून तशी सेवाही मिळत असून देखील या समाजातील अनेक कलावंत शासनाच्या योजनेतून वंचित असल्याचेच दिसतात.
शासनाने आम्हा कलावंतांना सलून दुकानासाठी गाळे तथा अत्याधुनिक सलून साहित्य तसेच कर्ज द्यावे अशी मागणी सलूनधारक करीत आहेत. आज सलून व्यावसायिक हे आधुनिक पद्धतीचे शास्त्रशुद्ध शिक्षण घेतलेले असून हे कारागीर अभिनेते, खेळाडूंनी केलेल्या हेअर स्टाईल अगदी सेम टू सेम करतात. आम्ही सौंदर्य फुलविण्याचे कार्य करीत असतो. यामुळे आम्हाला शासनाच्या योजनांचा लाभ मिळायला हवा, असे मत ही काही सलून व्यावसायिकांनी व्यक्त केले.