सरकारला अडचणीत आणण्याचे नवे प्रयोग सुरूच

मुंबई –  राज्यात कोरोनाचं संकट उभं राहिलं असताना राजकारणी मात्र एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी सोडताना दिसत नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संकटकाळात एकजुटीने सामना करु, पक्षीय राजकारण बाजूला ठेवा असं वारंवार आवाहन करत असतानाही भाजपा नेत्यांकडून उद्धव ठाकरेंना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सुरु आहे.

याच संदर्भात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राज्यपालांवर निशाणा  साधला आहे. संजय राऊत यांनी ‘सामना’तील रोखठोक या सदरातून  भाष्य केले आहे. या सदरात त्यांनी राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांच्या रखडलेल्या नियुक्त्यांवरून भाजापावर घणाघाती टीका केली आहे.

 काय आहे ‘सामना’तील  रोखठोक सदर

राज्यपाल नियुक्त 12 सदस्यांची नियुक्ती हा सध्या राज्यातील गरमागरमीचा विषय झाला आहे. विविध क्षेत्रांतले तज्ञ राज्यपाल नेमतात, पण त्यांच्या शिफारसी मंत्रिमंडळ करते. त्यांची नेमणूक वेळेत झाली नाही तर ती घटनेची पायमल्ली व स्वातंत्र्याची मुस्कटदाबी ठरेल. आणीबाणीत नेमके हेच झाले होते!

कोरोनाचे संकट धुमाकूळ घालीत असले तरी देशातले राजकारण काही थांबले नाही. या ना त्या कारणाने ते सुरूच आहे. चीनच्या घुसखोरीचे राजकारण होते तसे कोरोना महामारीचेही सुरूच आहे. महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार राजू परुळेकर यांना एक मुलाखत दिली. त्यात ते सांगतात, ”महाराष्ट्राचे ठाकरे सरकार पाडण्यात आम्हाला अजिबात रस नाही. ते अंतर्विरोधाने पडेल.” सरकार पाडण्याचे सर्व प्रयत्न फसल्यावर विरोधी पक्षनेत्यांना हे शहाणपण सुचले. सरकार पाडणार नाही, पण सरकारला अडचणीत आणण्याचे नवे प्रयोग सुरूच राहतील.

विधान परिषदेत राज्यपाल नियुक्त 12 जागा भरायच्या आहेत. या 12 जागांचे राजकारण आताच सुरू झाले आहे. सरकारने शिफारस केलेले 12 सदस्य विधान परिषदेत जाऊ नयेत असे विरोधी पक्षाला वाटत आहे. महाराष्ट्रात तीन प्रमुख राजकीय पक्ष एकत्र आले व त्यांनी 105 आमदारांचा सगळ्यात मोठा पक्ष असलेल्या भारतीय जनता पक्षाला दूर ठेवून सरकार बनवले. शिवसेना, काँगेस व राष्ट्रवादी काँगेस अशा तीन पक्षांत या 12 राज्यपाल नियुक्त सदस्यांची वाटणी होईल. हे 12 सदस्य कोण व त्यांची नेमणूक राज्यपाल करतील काय? हाच प्रश्न आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.