महामार्ग व रस्ते वाहतूक विभागाचे स्पष्टीकरण जारी
पुणे – बहुतांश वाहनांसाठी 1 एप्रिल 2020 पासून बीएस 6 उत्सर्जन मानदंड लागू केले जाणार आहेत. आता या वाहनांमध्ये क्वाड्रीसायकलचाही समावेश करण्यात आला आहे. इतर वाहनांना बीएस 6 मानदंड लागू केले जाणार आहेत. त्यामुळे तेच मानदंड क्वाड्रीसायकलला लागू केले जातील का याबाबत साशंकता निर्माण झाली होती. याबाबत आज महामार्ग आणि रस्ते वाहतूक विभागाने परिपत्रकाद्वारे हे स्पष्टीकरण जारी केले.
सध्या बाजारपेठेत विकल्या जात असलेल्या क्वाड्रीसायकलला भारत स्टेज 4 उत्सर्जन मानदंड लागू आहेत. बीएस-6 हे मानदंड युरोपियन मानदंडाशी संलग्न आहेत. त्यामुळे या वाहनांची चाचणी, मजबूती याबाबतचे युरोपियन मानदंड क्वाड्रीसायकलही लागू होणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. नवे उत्सर्जन मानदंड लागू झाल्यानंतर वाहन कंपन्यांना या मानदंडाची वाहने विकावी लागणार आहेत. त्यासाठी कंपन्यांनी तांत्रिक तयारी पूर्ण केलेली आहे. त्याचबरोबर या नव्या मानदंडाच्या वाहनासाठी इंधनही अधिक शुद्ध असावे लागणार आहे. त्यासाठी इंधन कंपन्यांनी अगोदरच गुंतवणूक करून यंत्रणा विकसित केलेली आहे. त्यामुळे नवी वाहने महाग होणार आहेत. त्याचबरोबर त्यासाठीचे इंधनही महाग होणार आहे. हा नियम क्वाड्रीसायकललाही लागू झाला आहे.