निवडणूक प्रशिक्षणाला 156 कर्मचाऱ्यांची दांडी

कर्जत प्रांताधिकाऱ्यांकडुन कारवाईचे संकेत
जामखेड: कर्जत जामखेड विधानसभा निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पडावी याकरिता अधिकारी, कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यास सुरुवात झाली आहे. प्रशिक्षण सत्राला तब्बल 156 अधिकारी, कर्मचाऱ्यांनी दांडी मारली आहे. त्यामुळे प्रांताधिकारी या कर्मचाऱ्यांवर कारवाई करणार का असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.

विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया निर्विघ्न व सुरळीत पार पडावी याकरिता जिल्हा प्रशासनाने कंबर कसली आहे. मतदान आणि मतमोजणीची प्रक्रीया सुरळीत पार पाडणे हे जोखमीचे काम असते. त्यामुळे या कामासाठी नियुक्त केलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार प्रशिक्षण देणे अनिवार्य असते.

एकीकडे उमेदवारी अर्जांचे वितरण आणि स्वीकृतीला सुरुवात झाली असताना अधिकारी, कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याचे कामही हाती घेण्यात आले आहे. विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 चे मतदान प्रक्रियेचे अनुषंगाने 227 कर्जत जामखेड विधानसभा मतदार संघातील मतदान केंद्राध्यक्ष, सहाय्यक मतदान केंद्राध्यक्ष यांना रविवारी शिवपार्वती मंगल कार्यालय कर्जत येथे सकाळ सत्र व दुपार सत्र अशा दोन सत्रामध्ये प्राथमिक स्वरूपाचे प्रशिक्षण देण्यात आले. तसेच इतर मतदान अधिकारी यांना EVM व VVPAT मशीन प्रत्यक्ष हाताळणी बाबत प्रात्यक्षिक प्रशिक्षण महात्मा गांधी विद्यालय कर्जत येथे देण्यात आले आहे.

या प्रशिक्षणास मतदान अधिकारी यांनी 1852 कर्मचाऱ्यांना हजर राहण्याचे आदेश दिले होते. त्यापैकी 1696 अधिकारी कर्मचाऱ्यांनी या प्रशिक्षण केंद्राला उपस्थित राहून आपली जबाबदारी समजून घेतली, तर 156 अधिकारी, कर्मचाऱ्यांनी मात्र या प्रशिक्षण वर्गाकडे पाठ फिरविली आहे. गैरहजर मतदान अधिकाऱ्यांमध्ये 57 मतदान केंद्राध्यक्ष, 35 सहायक मतदान केंद्राध्यक्ष व 64 इतर मतदान अधिकारी यांचा समावेश आहे.

सदर प्रशिक्षणात व्हीव्हीपॅट मशीनचे कार्य, त्यावर मतदारांना दिसणारी पावती, ईव्हीएम यंत्र आणि त्यामधील तांत्रिक बाबींची माहिती उपस्थित कर्मचाऱ्यांना देण्यात आली. यंत्रांची जोडणी व हाताळणी याबाबत निवडणूक आयोगाच्या निर्देशाची माहिती आणि प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. गैरहजर मतदान अधिकाऱ्यांवर लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1951 चे कलम 134 अन्वये कारवाई प्रस्तावित करण्यात येत असल्याची माहिती प्रांताधिकारी कार्यालयाकडुन देण्यात आली आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)