दिल्लीवार्ता- उत्तराखंड: चार-चार मुख्यमंत्र्यांची अग्निपरीक्षा

वंदना बर्वे

राष्ट्रप्रेमी आणि राष्ट्रद्रोही या दोन घोड्यावर स्वार होऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तराखंडसह देशाचा किल्ला जिंकायला निघाले आहेत. उत्तराखंड म्हणजे सैनिकांचा प्रदेश. प्रत्येक घरातील किमान एक तरुणाने सैन्यात दाखल होऊन देशसेवा करण्याचा संकल्प घेतला आहे. या निवडणुकीत मुख्यमंत्री त्रिवेंद्र रावत आणि माजी मुख्यमंत्री रमेश पोखरियाल, विजय बहुगुणा आणि हरीश रावत यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

आता उत्तराखंडमधील लोकसभेच्या पाचही जागांवर विजय मिळविण्याचं आव्हान भारतीय जनता पक्षासमोर आहे. महत्त्वाचा मुद्दा असा की, उत्तराखंडच्या स्थापनेपासून या राज्यात ज्या-ज्या पक्षाचे सरकार राहिले आहे; त्या पक्षाला लोकसभेच्या निवडणुकीत माती खावी लागली आहे. भाजप आता देवभूमिबाबतची ही दंतकथा खोटी ठरविते की त्यास बळी पडते हे 23 मे रोजी स्पष्ट होईल. उत्तराखंडमध्ये पहिल्या टप्प्यात अर्थात 11 एप्रिल रोजी मतदान होणे आहे. 2014च्या निवडणुकीत राज्यातील पाचही जागांवर विजयी पताका फडकविणाऱ्या भाजपने 2017 मधील विधानसभेच्या निवडणुकीत 70 पैकी 57 जागांवर विजय मिळविला होता.

पुलवामा हल्ल्यानंतर अख्खा उत्तराखंड शोकसागरात बुडाला होता. राज्यातील दोन मेजरसह दोनचार जवान वीरगतीला प्राप्त झाले होते. वायुसेनेच्या जवानांनी एअर स्ट्राइक केल्याची बातमी ऐकल्यानंतर उत्तराखंडवासियांनी पहिला समाधानाचा श्‍वास घेतला होता. उत्तराखंडवासियांची नाडी हाती लागल्यानंतर भाजपने पाऊल उचलायला सुरुवात केली. संरक्षण मंत्री निर्मला सितारामन शहिदांच्या घरी गेल्या. कुटुंबातील सदस्यांचे सांत्वन केले. एवढंच नव्हे तर, घरातील महिलांच्या पायासुद्धा पडल्या. यानंतर कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे सुद्धा तीन शहीद जवानांच्या घरी गेले आणि तीन लाख मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहा राष्ट्रप्रेमी आणि राष्ट्रद्रोही या दोन घोड्यांवर स्वार झाले आहेत. मात्र, संरक्षण मंत्रालयाच्या स्थायी समितीचे अध्यक्ष मेजर जनरल (सेवानिवृत्त) भुवनचंद्र खंडुरी यांना भाजपने हटविले होते. राहुल गांधी यांनी नेमकी हीच बाब हेरली आणि भुवनचंद्र खंडुरी यांचे चिरंजीव मनीष खंडुरी यांना कॉंग्रेसमध्ये आणले. सत्ताधारी भाजप आणि कॉंग्रेसमध्ये गटबाजी उफाळून समोर आली आहे. फरक एवढाच की, कॉग्रेसची गटबाजी चव्हाट्यावर आल्याचे दिसून येते. तर, भाजपातील गटबाजी उघडपणे दिसून येत नाही.

नैनीताल- उधमसिंग नगर: नैनीतालचे मतदार लहरी स्वभावाचे आहेत. हवेत उडणाऱ्यांचे पंख छाटण्यातही पटाईत. कॉंग्रेसचे दिग्गज दिवंगत ज्येष्ठ नेते नारायणदत्त तिवारी याच मतदारसंघातून तीन वेळा विजयी झाले होते. देशभरातील कॉंग्रेसचे नेते तिवारी यांच्या घरी हजेरी लावायचे. त्यांच्या शब्दाला एक मान होता. मात्र, 1991च्या निवडणुकीत नैनीतालवासियांनी घरी बसविले. हा लहरीपणा अधून-मधून उफाळून येतो. उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री आणि कॉंग्रेसचे महासचिव हरीश रावत यांनी नैनीतालमधून ताल ठोकली आहे. तर राज्यातील सत्ताधारी भाजपने प्रदेशाध्यक्ष अजय भट्ट यांना मैदानात उतरविले आहे.

रावत मुख्यमंत्री होते तेव्हा भट्ट विरोधी पक्षनेते होते. दोन्ही नेते तोडीचे असल्यामुळे लढत जबरदस्त होण्याची शक्‍यता आहे. हे खरे असले तरी, मागच्या विधानसभेच्या निवडणुकीत हरीश रावत किच्छा आणि हरिद्वार या दोन्ही ठिकाणाहून पराभूत झाले होते. तर अजय भट्ट यांना रानीखेतमधून पराभवाचे तोंड बघावे लागले होते. हरीश रावत राजकारणात पटाईत आणि प्रशासकीय कामात तरबेज आहेत. 4 वेळा खासदार, दोनवेळा केद्रात मंत्री, राज्याचे मुख्यमंत्री आणि कमालिचे संघटन कौशल्य असा दांडगा अनुभव पाठिशी आहे. परंतु गटबाजीचा फटका बसू शकतो. अजय भट्ट दीर्घ अनुभवी आहेत. नैनीताल लोकसभा मतदारसंघात 14 विधानसभा मतदारसंघ आहेत. यात उधमसिंग नगर जिल्ह्यातील जसपूर, काशीपूर, बाजपूर, गदरपूर, रूद्रपूर, किच्छा, सितारगंज, नानकमत्ता आणि खटीमाचा समावेश आहे. तर नैनीताल जिल्ह्यातील लालकुंआ, भीमताल, नैनीताल, हल्द्वानी आणि कालाढुंगीचा समावेश आहे.

पौडी गढवाल: सैनिकबहुल गढवाल मतदारसंघात काट्याची लढत आहे. भाजपा आणि कॉंग्रेस थेट आमने-सामने आहे. भाजपच्या किल्ल्याला भगदाड पाडून कॉंग्रेसने भुवनचंद्र खंडुरी यांच्या चिरंजिवाला आणले आणि उमदेवारीसुद्धा दिली. भाजपने तिरथ रावत यांना रिंगणात उतरविले आहे. मेजर जनरल (सेवानिवृत्त) भुवनचंद्र खंडुरी यांनी स्थायी समितीच्या अहवालात पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या संरक्षणविषयक धोरणाचा समाचार घेतला होता. यामुळे तळपायाची आग मस्तकात गेलेल्या भाजपने खंडुरी यांना पदावरून हटविले. मनीष खंडुरी हाच मुद्दा वारंवार उपस्थित करीत आहे. पौडी गढवालमध्ये फक्त दोन मुद्दांची चर्चा आहे. पाकिस्तानवर एअर स्ट्राइकच्या माध्यमातून भाजपचा राष्ट्रवाद आणि खंडुरी यांना हटवून सैनिकांचा केलेला अपमान हा कॉंग्रेसचा मुद्दा.

हरिद्वार: भाजपने हरिद्वार मतदारसंघातून पुन्हा एकदा रमेश पोखरियाल निशंक यांच्यावर डाव लावला आहे. हरिद्वारमधून भाजपला सहाव्यांदा विजयी करण्याची जबाबदारी उत्तराखंडच्या माजी मुख्यमंत्र्यावर आहे. या जागेवर तिरंगी लढत होणार असून रमेश पोखरियाल यांना कॉंग्रेसचे अंबरिश कुमार आणि बसपाचे डॉ. अंतरिक्ष सैनी यांचा सामना करावा लागणार आहे. हरिद्वारमधून कॉंग्रेस चारवेळा तर भाजप पाचवेळा विजयी झाला आहे. उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र रावत यांचा डोईवाला आणि विधानसभेचे अध्यक्ष प्रेमचंद्र अग्रवाल यांचा ऋषीकेश मतदारसंघ हरिद्वार लोकसभा मतदारसंघात मोडतो. यामुळे भाजपच्या तीन दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा येथे पणाला लागली आहे.

हरिद्वारमध्ये 18 लाख 3 हजार 950 मतदार असून यात 9 लाख 66 हजार 576 मतदार पुरुष तर आठ लाख 37 हजार 240 मतदार महिला आहेत. 2014च्या निवडणुकीत पोखरियाल यांनी 5,92,320 मते मिळवून पहिल्यांदा संसदेत प्रवेश केला होता. यावेळेस हरीश रावत यांच्या पत्नी रेणुका यांना 4,14,498 मते मिळाली होती. हरिद्वार लोकसभेच्या क्षेत्रात धर्मपूर, डोईवाला, ऋषीकेश, मंगलौर, खानपूर, रूडकी, बीएचईएल रानीपूर, लक्‍सर, पीरान कलियर, झबरेडा, भगवानपूर आणि हरिद्वार ग्रामीण हे विधानसभा मतदारसंघ मोडतात.

टिहरी गढवाल: नेपाळच्या राजेशाही कुटुंबातील माला राजलक्ष्मी शाह विजयाची हॅट्ट्रिक मारण्यासाठी टिहरीमधून मैदानात आहेत. भाजपने त्यांच्यावर पुन्हा एकदा विश्‍वास टाकला आहे. येथेही तिरंगी लढत असून कॉंग्रेसचे प्रीतम सिंग आणि माकपाचे राजेंद्र पुरोहित यांच्याशी थेट सामना आहे. सिंग हे पाचवेळापासून आमदार आहेत. सुरुवातीला येथून विजय बहुगुणा यांना उतरविले जाईल अशी चर्चा होती. परंतु ती केवळ अफवा ठरली. माला राजलक्ष्मी या नेपाळच्या राजेशाही कुटुंबातील असून त्यांचे लग्न टिहरीच्या राजेशाही घराण्यात झाले आहे. महत्त्वाचे म्हणजे, 2000 नंतर या मतदारसंघातून लोकसभेत निवडून जाणाऱ्या त्या एकमेव महिला होत.

अल्मोडा: अल्मोडा या राखीव मतदारसंघातून भाजपचे अजय टम्टा आणि कॉंग्रेसचे प्रदीप टम्टा यांच्यात थेट लढत आहे. मागील तीन निवडणुकांपासून याच दोन्ही नेत्यांमध्ये लढत होत असल्यामुळे ही निवडणूक अधिक रोमांचक झाली आहे. 2009 मध्ये प्रदीप टम्टा विजयी झाले होते. 2014 मध्ये मोदी लाटेत अजय टम्टा निवडून आले आणि आता 2019 मध्ये पुन्हा एकदा एकमेकांना धूळ चारण्याचा प्रयत्न करतील.

 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.