देशासमोर नवे संकट! अनेक राज्यात लसीचा तुटवडा; लसीकरण मोहीम ठप्प?

नवी दिल्ली: एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच जात आहे तर दुसरीकडे देशासमोर नवे संकट उभे राहिले आहे. कोरोना लसींच्या तुटवडा देशातील अनेक राज्यांमध्ये निर्माण झाला आहे. केंद्राकडे सातत्याने कोरोना लसींचा पुरवठा मोठ्या प्रमाणावर करण्याची मागणी केली जात आहे. लसींच्या अभावी महाराष्ट्र, दिल्लीसह अनेक राज्यांमध्ये कोरोना लसीकरण मोहीम ठप्प होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

महाराष्ट्रातील कोरोना लसींच्या तुटवड्यामुळे केंद्र विरुद्ध राज्य असा वाद रंगताना दिसतोय. महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांकडून केंद्राला कोरोना लसींच्या पुरवठ्याबाबत मागणी केली जात आहे. तसेच आरोप-प्रत्यारोपही होताना दिसत आहेत. महाराष्ट्रासह दिल्ली, तेलंगण, ओडिशा, आंध्र प्रदेश, छत्तीसगड या राज्यांमध्ये कोरोना लसींचा तुटवडा जाणवू लागल्याने आता लसीकरण मोहीम थांबवण्याची शक्यता निर्माण झाल्याचे सांगितले जात आहे.

दिल्लीतील कोरोना लसीकरण योग्य दिशेने सुरू आहे. मात्र, दिल्लीत केवळ चार दिवस पुरेल, एवढाच लसींचा साठा आहे. पर्याप्त लसीकरणासाठी आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांनी दोनवेळा केंद्राला पत्र पाठवल्याची माहिती मिळाली आहे. तर, दुसरीकडे आंध्र प्रदेशमध्ये केवळ तीन लाख लसींचे डोस उपलब्ध असून, फक्त दोन दिवस पुरेल, इतका लस साठा आहे. लसी उपलब्ध न झाल्यास लसीकरण केंद्र बंद करून मोहीम थांबवावी लागेल, असे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनी म्हटले आहे.

कोरोना लसीच्या कमतरतेमुळे ओडिशामधील १४०० पैकी तब्बल ७०० लसीकरण केंद्र बंद करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. राज्यातील अनेक ठिकाणची कोरोना लसीकरण केंद्र बंद करण्यात आली आहेत. राज्यात केवळ दोन दिवसांपुरताच कोरोना लसींचा साठा उपलब्ध आहे. कोरोना लसींचा पुरवठा झाला नाही, तर राज्यातील कोरोना लसीकरण ठप्प होईल, अशी शक्यता आरोग्यमंत्री नब किशोर दास यांनी वर्तवली आहे.

देशातील कोणत्याही भागात कोरोना लसीचा तुटवडा नसल्याचे केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी सांगितले. केंद्र सरकार सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना गरजेनुसार पुरवठा करत असल्याचे हर्षवर्धन यांनी यावेळी स्पष्ट केले. महाराष्ट्राला आतापर्यंत एक कोटी ०६ लाख कोरोना लसींचे डोस पुरवण्यात आले असून, ९० लाख डोस वापरले गेले आहेत, अशी माहिती डॉ. हर्षवर्धन यांनी दिली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.