मुंबई – दिग्दर्शक व अभिनेते महेश कोठारे यांच्या कोठारे व्हिजनची नवी मालिका “दख्खनचा राजा ज्योतिबा’ नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीला आली. कोल्हापूर चित्रनगरीत या मालिकेचं चित्रिकरण सुरु आहे. लॉकडाऊन नंतर मराठीत जवळपास आठ नव्या मालिका सुरू होत आहेत. दख्खनचा राजा जोतिबाच्या महात्म्यावर आधारित “दख्खनचा राजा जोतिबा’ ही मालिक आहे.
दरम्यान, ही मालिका सुरु होताच वादाच्या फेऱ्यात सापडली आहे. या मालिकेवर जोतिबा डोंगरावरील ग्रामस्थ आणि पुजाऱ्यांनी आक्षेप घेतला असून मालिका त्वरीत बंद करण्याची मागणी केली आहे. यासाठी ग्रामस्थ आणि पुजाऱ्यांनी मंदिरापुढे निदर्शने केली.
तसंच मालिकेतील चुकीच्या गोष्टींवर आक्षेप घेत मालिका बंद करण्याची मागणी करणारे निवेदन जोतिबाचे सरपंच राधा बुणे यांच्याकडे सोपवण्यात आले आहे. ‘सत्यकथा दाखवा अन्यथा मालिका बंद करा,’ असे निवेदनात म्हंटले आहे.
नवोदित अभिनेता ‘विशाल निकम’ मालिकेत ज्योतिबाची मुख्य भूमिका साकारत आहे. यापूर्वी विशाल ‘सात जलमाच्या गाठी’ या मालिकेत झळकला होता. कोल्हापूर चित्रनगरीत सलग चार वर्ष मालिकेचे शुटिंग सुरू राहणार आहे.