नवी दिल्ली – भारतात ब्रिटनमधील नवीन करोना विषाणुंची बाधा झालेल्यांची संख्या आता 82 झाली आहे. 6 जानेवारी पर्यंत ही संख्या 73 इतकी होती. आरोग्य मंत्रालयाने आज ही माहिती दिली.
या नवीन रूग्णांच्याबाबतीत स्वतंत्रपणे काळजी घेतली जात असून त्यांच्या संपर्कातील लोकांचा शोध घेऊन त्यांना क्वारंटाईन केले जात आहे. या विषाणुचा प्रादुर्भाव मूळ करोना विषाणुंपेक्षाही अधिक वेगाने होत असल्याने त्या संबंधात वैद्यकीय यंत्रणा अधिक सतर्क असल्याची ग्वाहीही आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.
ब्रिटनमधील हा विषाणु जगातल्या चाळीस देशांत पसरला असल्याचेही निदर्शनाला आले असून त्यामुळे जगात आता एक नवीनच चिंता उद्भवली आहे. अनेक देशांनी ब्रिटनहून येणाऱ्या विमानांवरील बंदीची मुदतही वाढवली आहे.