पुणे – बऱ्याच नागरिकांना वेळोवेळी व्यवहार करताना आणि कर विवरण भरताना पॅनकार्डचा म्हणजे “परमनंट अकाउंट नंबर’चा वापर करावा लागतो. त्यामुळे आधुनिक जीवनशैलीत पॅनकार्ड अनेकांच्या जीवनाचा अविभाज्य घटक झाला आहे. मात्र, अनेकदा पॅनकार्ड हरवले जाते किंवा पाण्यामुळे किंवा इतर कारणांमुळे खराब होते. अशावेळी काय करावे, हा प्रश्न निर्माण होतो. मात्र, सरकारने आता उपलब्ध केलेल्या एका योजनेनुसार पॅनकार्डची प्रिंट किंवा कॉपी ऑनलाइन मागणी केल्यास उपलब्ध होऊ शकणार आहे.
प्राप्तिकर विभाग सर्वसाधारणपणे पॅनकार्ड यूटीआयटीएसएल व एनएसडीएल-टीआयएन यांच्यामार्फत जारी करतो. तुम्ही कोणत्याही एजन्सीकडून पॅनकार्ड मिळविले असले तरी कोणत्याही एजन्सीकडे री-प्रिंटची मागणी केल्यास पॅनकार्डची री-प्रिंट उपलब्ध होणार आहे. ज्यांना पॅनकार्डची री-प्रिंट हवी आहे, त्यांनी एनएसडीएल किंवा यूटीआयटीएसएलच्या वेबसाईटवर जाणे अपेक्षित आहे.
या वेबसाईटवर री-प्रिंट पॅनकार्ड हा पर्याय असतो. याठिकाणी आवश्यक ती माहिती उपलब्ध केल्यानंतर पॅनकार्ड घरी येते. ज्यावेळी पॅनकार्डमधील माहितीत कोणताही बदल करायचा नसतो. त्यावेळी हा पर्याय वापरता येतो. भारतात कुठेही पॅनकार्डची प्रिंट हवी असल्यास 50 रुपये शुल्क लागते तर, भारताबाहेर यासाठी 959 रुपये द्यावे लागतात. प्राप्तिकर विभागाकडे तुमचा जो घरचा पत्ता दिलेला आहे त्या घराच्या पत्त्यावर या पॅनकार्डची री-प्रिंट येते. री-प्रिंटची मागणी करताना तुम्हाला पॅनकार्डचा नंबर आणि जन्मतारीख सांगावी लागते. त्याचबरोबर तुमच्याकडे आधार क्रमांक मागितला जातो.